४० लाखांसाठी पालिकेची परिवहनला वसुली नोटीस

आगाऊ दिलेले चाळीस लाख (40 lakhs) रुपयांचे भाडे वसूल करण्यासाठी वसई-विरार महापालिकेने (Vasai-Virar Municipal Corporation) परिवहन (transport ) ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिका आणि ठेकेदार यांच्यात नवा वाद सुरू झाला आहे. महापालिकेची परिवहन सेवा भगीरथी ट्रान्सपोर्ट ठेकेदारामार्फत सन २०१२ ला सुरू करण्यात आली होती.

वसई : आगाऊ दिलेले चाळीस लाख (40 lakhs) रुपयांचे भाडे वसूल करण्यासाठी वसई-विरार महापालिकेने (Vasai-Virar Municipal Corporation) परिवहन (transport ) ठेकेदाराला नोटीस बजावली आहे. त्यामुळे पालिका आणि ठेकेदार यांच्यात नवा वाद सुरू झाला आहे. महापालिकेची परिवहन सेवा भगीरथी ट्रान्सपोर्ट ठेकेदारामार्फत सन २०१२ ला सुरू करण्यात आली होती. पालिकेच्या ताब्यात असलेल्या १६० गाड्यांपैकी १३० गाड्या या ठेकेदाराच्या होत्या. ४३ मार्गावर ही सेवा सुरू असल्यामुळे आणि भाडे कमी असल्यामुळे एसटी महामंडळाला आपला गाशा गुंडाळावा लागला होता. ही सेवा लॉकडाऊनच्या काळात ठेकेदाराने बंद केली. त्यामुळे लोकल ट्रेन बंद, एसटी बंद आणि परिवहनही बंद झाल्यामुळे वसईकर हैराण झाले होते. परिणामी पालिकेने अनेकदा बैठका घेऊन बसेस सुरू करण्याची विनंती वजा आदेश भगीरथी कंपनीला दिले होते.

मात्र हे आदेश धुडकावल्यामुळे अखेर नाइलाजाने परिवहन ठेका रद्द करून नवीन ठेकेदार नेमण्याचे आदेश आयुक्त गंगाथरण यांनी दिले. तर लॉकडाउनच्या काळात झालेला तोटा भरून काढण्यासाठी पालिकेने ५० टक्के आर्थिक सहाय्य करावे अशी मागणी ठेकेदार यांनी केली होती मात्र या मागणीकडे पालिकेने दुर्लक्ष करून ठेकेदाराचा वचपा काढला. दरम्यान पालिकेने ठेकेदाराविरुद्ध आणखी एक हत्यार उपसले आहे.

शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवहन सेवा मोफत ठेवण्यात आली होती. त्याचे भाडे पालिकेकडून ठेकेदाराला आगाऊ दिले जात होते २०२० च्या शैक्षणिक वर्षातील एप्रिल पर्यंतचे आगाऊ भाडे पालिकेच्या महिला व बालकल्याण समितीने मार्च महिन्यातच दिले होते. मात्र वीस तारखे पासून शाळा बंद झाल्या, तेव्हापासून एक्केचाळीस दिवस विद्यार्थ्यांनी परिवहन सेवेचा लाभ घेतला नाही त्यामुळे या ४१ दिवसांचे आगावु दिलेले ४० लाख रुपये भाडे परत करावे अशी नोटीस ठेकेदाराला बजावण्यात आली आहे.

या आठवड्यात ही नोटीस बजावण्यात आली आहे. शाळाच बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांनी ४१ दिवस बसचा वापर केला नाही त्यामुळे नियमानुसार हे भाडे परत करावे अशी नोटीस बजावण्यात आली आहे.त्याला अद्याप ठेकेदाराने उत्तर दिलेले नाही.

राजेश घरत महिला बाल कल्याण समिती सहाय्यक आयुक्त

लॉकडाऊनच्या काळात कोणीही भाडे परतावा मागितलेले नाही. आम्हालाही लॉकडाऊनमुळे मोठा फटका बसला आहे त्यामुळे महापालिकेने ही रक्कम मागू नये असे उत्तर आम्ही दिले आहे. तसेच सर्व कामगारांची बैठक घेण्यात आली असून आयुक्तांशी चर्चा करुन लवकरच सेवा सुरू करण्याचा विचार आहे.

मनोहर सकपाळ महासंचालक,भगीरथी ट्रान्स कार्पोरेशन