”आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?” चित्रा वाघ यांचा खोचक प्रश्न ; गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे टीकास्त्र

मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निकाल दिला. अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा देत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

    मुंबई: “राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला. पण आता प्रश्न उरतो की, नवा वसुली मंत्री कोण?”, असा खोचक सवाल विचारात मंत्रिमंडळातील एखादा चेहरा बदलल्याने महाविकास आघाडी सरकारचा भ्रष्ट हेतू काही बदलणार नाही, अशी टीका चित्रा वाघ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर राजीनामा दिल्यानंतर केली आहे.


    माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंगांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोप प्रकरणात उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिलेत. देशमुखांच्या राजीनाम्यानंतर आता भाजपकडून जोरदार टीका केली जात आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.

    परमबीर सिंग यांच्या आरोप प्रकरणात आज मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे देण्याचा निकाल दिला. त्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरुन राजीनामा देत असल्याचं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.