मुुंबई महानगरपालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांची नियुक्ती – आयुक्तांनी विशेष बैठकीमध्ये केले मार्गदर्शन

मुंबई: महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ३ प्रमुख सर्वोपचार रुग्णालयांच्या अधिक प्रभावी देखरेख व व्यवस्थापनासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील तीन

मुंबई:  महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ३ प्रमुख सर्वोपचार रुग्णालयांच्या अधिक प्रभावी देखरेख व व्यवस्थापनासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील  तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती नुकतीच केली आहे. या अनुषंगानेे संबंधित आदेशानुसार मुंबई सेंट्रल परिसरात असणाऱ्या नायर रुग्णालयासाठी  मदन नागरगोजे, परळ परिसरात असणाऱ्या के.ई.एम. रुग्णालयासाठी  अजित पाटील; तर शीव परिसरात असणाऱ्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयासाठी बालाजी मंजूळे यांची नियुक्त करण्यात आली आहे. या नवनियुक्त अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक आज दुपारी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती.

या बैठकी दरम्यान महापालिका आयुक्त  चहल यांनी  नवनियुक्त अधिकाऱ्यांना कोरोनाच्या अनुषंगाने महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये असलेल्या सेवा सुविधा आणि मनुष्यबळ याविषयी थोडक्यात व महत्त्वाची माहिती दिली. तसेच महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांच्या अधिक प्रभावी व्यवस्थापनासाठी सोपविलेल्या जबाबदारीविषयी त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षांबद्दलही सांगितले.
महापालिकेच्या बी. वाय. एल. नायर रुग्णालयाची जबाबदारी ज्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे, ते  मदन नागरगोजे हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या २००७ च्या तुकडीचे अधिकारी असून ते सध्या राज्य शासनात उपसचिव या पदावर कार्यरत आहेत. केईएम रुग्णालयाचे व्यवस्थापकीय दायित्व सोपविण्यात आलेले अजित पाटील हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष २००७ च्या तुकडीचे अधिकारी असून ते सध्या महा-आयटी महामंडळाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. तर सध्या राज्य शासनाच्या नियोजन विभागात उपसचिव पदावर कार्यरत असणारे  बालाजी मंजुळे हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष २००९ च्या तुकडीचे अधिकारी असून त्यांच्याकडे शीव येथील लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
मुंबईतील जी. टी. रुग्णालय आणि जे. जे. रुग्णालय, या राज्य शासनाच्या अखत्यारीतील रुग्णालयांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव सुशील खोडवेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या वर्ष २०११ च्या तुकडीतील अधिकारी आहेत.  खोडवेकर हे देखील महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनात आज आयोजित बैठकीला उपस्थित होते. या अधिकाऱ्यांना त्यांचे राज्य शासनातील काम सांभाळून रुग्णालयांच्या व्यवस्थापनाचे काम तात्पुरत्या स्वरूपात बघावयाचे आहे, असेही संबंधित आदेशात नमूद करण्यात आले आहे.