राज्यातील ६७.६ टक्के शाळांमध्ये ऑफलाईन शिक्षण सुरु

-आठवड्याभरात विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत लक्षणीय वाढ : विद्यार्थ्यांची उपस्थिती १२ टक्‍क्‍यांवर

 

मुंबई : राज्यातील अनेक ठिकाणी नववी, दहावी व बारावीच्या शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्यानंतर हळूहळू विद्यार्थ्यांच्या पटसंख्येतही हळूहळू वाढ हाेत असल्याचे सांगण्यात येत आहे . आतापर्यंत राज्यातील ६७.६ टक्के शाळांमध्ये ऑफलाईन िशक्षण (offline Education)सुरु झाले आहे . यामध्ये दरदिवशी सुमारे १२ टक्केहून अधिक विद्यार्थी उपस्थित राहत असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने २३ नोव्हेंबरपासून नववी, दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाची परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनावर शाळा सुरू करण्याचा निर्णय सोपविण्यात आला. त्यानुसार २३ नोव्हेंबरला राज्यातील ९ हजार १२७ शाळा उघडल्या. या शाळांमध्ये २ लाख ९९ हजार विद्यार्थी उपस्थित होते. यानंतर हळूहळू विद्यार्थीसंख्येत लक्षणीय वाढ होउ लागली असल्याचे सांगण्यात येत आहे
दरम्यान, २ डिसेंबरपर्यंत राज्यातील शाळांमधील पटसंख्या ४ लाख ९१ हजार ९६२ वर पोहोचली आहे. आठवड्याभरातच विद्यार्थीसंख्येत वाढ झाली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत राज्यभरातील ११ हजार २९६ शाळा सुरू झाल्या असून याची टक्केवारी ६७.६ टक्के आहे. तर विद्यार्थ्यांची दैनदिंन उपस्थिती १२.३ टक्केपर्यंत पोहचली आहे. आतापर्यंत नववी, दहावी आणि बारावीच्या एकूण २ लाख २७ हजार ७७५ शिक्षकांपैकी १ लाख ५१ हजार ५३९ शिक्षकांची कोरोना चाचणी पार पडली असून त्यांपैकी २ हजार २१२ शिक्षक पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर ९२ हजार ३४३ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी ५६ हजार ३४ कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी झाली आहे. त्यापैकी ६८२ जण पॉझिटीव्ह आढळले असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सोलापूर(Solapur ) जिल्ह्यातील सर्वाधिक ५०.९ टक्के विद्यार्थी उपस्थित होते. पुणे(Pune) जिल्ह्यात विद्यार्थी उपस्थितीचे प्रमाण सर्वात कमी केवळ १.९ टक्के इतकेच होते.

सर्वाधिक पटसंख्येचे जिल्हे – टक्केवारी
सोलापूर ५०.९%, धाराशीव २६.९%, सिंधुदुर्ग २३.४%, सातारा २१.६%, लातूर १९.६%, सांगली १८.५%

सर्वाधिक शाळा सुरू झालेले जिल्हे – टक्केवारी
गडचिरोली ९८.३% , नांदेड ६६.७%, सोलापूर ९५.९%, धाराशीव ९४.७%,भंडारा ९२.१%, लातूर ९१.६%, वाशीम ९१.५%, सातारा ९०.४%