On Sharad Pawar's birthday, the Thackeray government will give him a unique gift

शरद पवारांच्या नावाने राज्यात नविन योजना लागू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्यात ‘शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना’ लागू करण्याची महाविकास आघाडी सकारची  योजना आहे.  ग्रामीण आणि शहरी भाग समृद्ध करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

मुंबई : शरद पवारांच्या नावाने राज्यात नविन योजना लागू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. राज्यात ‘शरद पवार ग्रामीण समृद्धी योजना’ लागू करण्याची महाविकास आघाडी सकारची  योजना आहे.  ग्रामीण आणि शहरी भाग समृद्ध करणे हा या योजनेचा उद्देश आहे.

महाविकास आघाडी सरकारने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८०व्या वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या संयोजनातून शरद पवार ग्रामसमृध्दी योजना राज्य योजना म्हणून राबविणार असल्याचा निर्णय घेतला आहे. १२ डिसेंबरला पवार यांचा वाढदिवस असतो.राज्यमंत्रीमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोसर्वा शरद पवार यांच्या नावे असलेली ही योजना देशपातळीवरील राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) या योजनेशी जोडण्यात येणार आहे.

शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीसाठी रोजगार हमी विभाग हा नोडल विभाग असेल. ही योजना लागू झाल्यानंतर ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठे बदल घडून येतील. ग्रामीण भागातील लोक सशक्त बनतील असा दावा राज्य सरकारने केला आहे.

या योजनेंतर्गत १ लाख किमी रस्त्यांची निर्मिती केली जाणार असून हे रस्ते शेतीपट्ट्यांना जोडले जातील. यामुळे शेतीपर्यंत जाणं सोयीचं होईल आणि रोजगारही उपलब्ध होईल. याशिवाय या योजनेंर्गत तलाव आणि तबेल्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. शरद पवार ग्रामीण समृद्धी योजनेवर पुढील तीन वर्षात १,००,००० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.

कामांतून सामूहिक आणि वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून सन २०२२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट करून प्रत्येक ग्रामपंचायत आणि त्या ग्रामपंचायतीतील घटक गावे समृद्ध होतील हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून योजना राबविण्यात येणार आहे.  मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र समृद्ध या ध्येयासाठी चार वैयक्तिक लाभाच्या योजना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत राबविण्यात येतील. त्यामध्ये प्रत्येक लाभार्थीला गाय आणि म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे, शेळीपालन शेड बांधणे, कुक्कूटपालन शेड बांधणे तसेच भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग या चार वैयक्तिक कामांच्या माध्यमातून लाभ मिळवून देण्यात येईल.