On the day of Mahaparinirvana, Dr. Social Justice Minister Dhananjay Munde's big announcement after greeting Babasaheb Ambedkar

मुंबई : महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी  मोठी घोषणा केली आहे. १४ एप्रिल २०२३ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे लोकार्पण होईल, अशी घोषणा मुंडे यांनी केली आहे.

आज महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवरांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. त्यावेळी झालेल्या छोटेखानी समारोहात धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकरात लवकर पूर्ण करु असा विश्वास व्यक्त केला आहे. डॉ. आंबेडकर यांचे स्मारक लवकरात लवकर करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु आहे. कोरोनामुळे काही अडचणी आल्या आणि त्यामुळे काम रखडले, अशी खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री संजय बनसोडे आणि आमदार सुनील शेळके उपस्थित होते. ‘बाबासाहेबांचे स्मारक आमच्यासाठी आस्थेचा विषय आहे. जगाला हेवा वाटेल असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक महाविकास आघाडी सरकार 2023 पर्यंत उभारेल’, असा दावा सुळे यांनी देखील केला आहे.

असे आहे इंदू मिल येथील डॉ. आंबेडकर यांचे स्मारक

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या इंदू मिल येथील स्मारकामधील पुतळ्याची उंची ३५० फूट असेल. या पुतळ्याची उंची २५० फूट इतकी निश्चित करण्यात आली होती. तसेच स्मारकाचा चबुतरा शंभर फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून ४५० फूट इतकी होणार आहे. स्मारकाच्या निधीतही चारशे कोटींची वाढ करण्यात आली असून आता एकून ११०० कोटी निधी करण्यात आला आहे. तसेच या स्मारकाच्या कामाची संपूर्ण जबाबदारी ही एमएमआरडीएकडे देण्यात आली आहे. त्यासोबतच स्मारकात एक मोठे ग्रंथालय आणि विशेष म्हणजे येथे चवदार तळ्याची प्रतिकृतीही तयार करण्यात येणार आहे. हे स्मारक दोन वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न सरकार करणार आहे. या स्मारकामध्ये बौद्ध वास्तुरचना शैलीतील घुमट, संग्रहालय आणि प्रदर्शन भरविण्याची सोय असेल. तसेच पादपीठामध्ये ६ मीटर रुंदीचे चक्राकार मार्ग असतील.

या स्मारकामध्ये ६८ टक्के जागेत खुली हरित जागा असेल. या ठिकाणी चारशे लोकांची आसनक्षमता असलेले व्याख्यान वर्ग आणि कार्यशाळा घेण्याची सोय असलेले ध्यानगृह असेल. तसेच हजार लोकांची आसनक्षमता असलेले अत्याधुनिक प्रेक्षागृह असेल.