उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने राष्ट्रवादीची ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना; गुरुवारपासून योजनेला सुरुवात

कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांच्या देखभालीसाठी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (दि २२) गुरुवारपासूनच ही योजना लागू केली जाणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथून फेसबुक लाईव्हवरून दिली.

    मुंबई : कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांच्या देखभालीसाठी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या (दि २२) गुरुवारपासूनच ही योजना लागू केली जाणार आहे, अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्ली येथून फेसबुक लाईव्हवरून दिली.

    ४५० राष्ट्रवादी दूत घेतील काळजी

    कोरोना काळात राज्यात अनाथ झालेल्या ४५० मुलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा त्यांनी केली. राज्यात कोरोना काळात अनाथ झालेल्या ४५० मुलांसाठी प्रेमाचा आधार म्हणून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येत आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या योजनेच्या वर्षभराच्या पहिल्या टप्प्यात पक्षातील प्रत्येकी एक असे ४५० सहकारी या ४५० अनाथ मुलांशी जोडले जाणार आहेत. त्यांना ‘राष्ट्रवादी दूत’ म्हटले  आहे. यामध्ये अनाथ मुलींसाठी पक्षातील महिला, युवती तर मुलांसाठी युवक किंवा पुरुष कार्यकर्ते ‘राष्ट्रवादी दूत’ म्हणून काम पाहतील, अशी माहिती त्यांनी दिली.

    व्यापक व पारदर्शक पध्दतीने मदतीचा कार्यक्रम

    ‘राष्ट्रवादी दूत’ या ४५० अनाथ मुलांच्या घरी जातील. या मुलांच्या काय गरजा अडचण समजून घेऊन त्याची माहिती पक्षाकडे देतील. शिवाय या अनाथ मुलांच्या माहितीचा प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे उपलब्ध असलेला डाटाही जमा केला जाईल त्यातून व्यापक व पारदर्शक पध्दतीने मदतीचा कार्यक्रम राबविला जाणार आहे. याबाबतची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाईटवर व स्वतः माझ्या पेजवर उपलब्ध राहील, असेही खा सुळे यानी स्पष्ट केले. या अनाथ मुलांच्या आयुष्यात आई-वडिलांची पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेतून केले जाणार आहे.