मुंबईला दीड लाख डोस उपलब्ध ; उद्या मुंबईतील लसीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने खुली राहणार

मुंबई सेंट्रल येथील केंद्रांतून हे डोस उपलब्ध झाले असून पालिका आणि खासगी लसीकरण केंद्रात आज कोव्हिशिल्डचा डोस घेता येणार आहे. सर्व केंद्रांवर कोरोनाची लस मिळू शकेल असेही सांगण्यात आले आहे.

  मुंबई : गेले काही दिवस मुंबईकर लस तुटवड्याला सामोरे जात असून लसीविना माघारी परतावे लागत आहे. लसीच्या कमतरतेमुळे मुंबईतील अनेक लसीकरण केंद्रे बंद झाली. आता मात्र मुंबईला १.५ लाख लसीचा डोस मिळाल्याने मुंबईतील लसीकरण केंद्र सोमवारी पूर्ण क्षमतेने खुली राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे आजचा दिवस मुंबईकरांना महत्वाचा ठरणार आहे.

  रविवारी संध्याकाळी पालिकेला दीड लाख कोव्हिशिल्ड लसीचे डोस मिळाले असल्याची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

  मुंबई सेंट्रल येथील केंद्रांतून हे डोस उपलब्ध झाले असून पालिका आणि खासगी लसीकरण केंद्रात आज कोव्हिशिल्डचा डोस घेता येणार आहे. सर्व केंद्रांवर कोरोनाची लस मिळू शकेल असेही सांगण्यात आले आहे.

  रविवारी लस उपलब्ध नसल्याने केवळ ३७ लसीकरण केंद्रे खुली होती. यात ७ खासगी लसीकरण केंद्रांचा समावेश होता. या लसीकरण केंद्रांवर उपलब्ध डोसनुसार लाभार्थ्यांना दुसर्‍या डोससाठी प्राधान्य दिले जात होते. यामुळे रविवारी अनेक लाभार्थ्यांना लसीविना केंद्रांकडून परत पाठवण्यात आले.

  पालिकेला रविवारी संध्याकाळी दीड लाखांहून अधिक डोस मिळाले असल्याची माहिती पालिकेचे कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली. हे डोस सर्व केंद्रांमध्ये पुरविले जातील, जेणेकरून सर्व केंद्रे सोमवारपासून कार्यान्वित होतील असेही त्यांनी साांगितले.

  दरम्यान, १३२ लसीकरण केंद्रांपैकी ३७ लसीकरण केंद्रांवर लसीचा दुसरा डोस घेणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात आले. तर कोव्हॅक्सिनचा मर्यादित साठा असून फक्त काहीच केंद्रांवर या लसीचा दुसरा डोस दिला जाणार आहे असेही स्पष्ट करण्यात आले आहे.