नाले सफाईवर दहा वर्षात एक हजार कोटींचा खर्च; पाणी तुंबण्याची समस्या मात्र कायम

मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याने मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने गेल्या काही वर्षात नालेसफाई, ब्रिमस्टोवॅड, पंपिग स्टेशन, मिठी नदीची सफाई आणि रेल्वे हद्दीतील नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च केला आहे. मागील दहा वर्षात नालेसफाईसाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करूनही पाणी तुंबण्याची समस्या कायम राहीली आहे.

    मुंबई : मुंबईमध्ये दरवर्षी पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत असल्याने मुंबईकरांना त्रासाला सामोरे जावे लागते आहे. पाणी साचण्याची समस्या दूर करण्यासाठी महापालिकेने गेल्या काही वर्षात नालेसफाई, ब्रिमस्टोवॅड, पंपिग स्टेशन, मिठी नदीची सफाई आणि रेल्वे हद्दीतील नालेसफाईसाठी कोट्यवधी रुपये खर्च केला आहे. मागील दहा वर्षात नालेसफाईसाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च करूनही पाणी तुंबण्याची समस्या कायम राहीली आहे.

    पावसाळ्यात पाणी साचू नये यासाठी दरवर्षी नालेसफाई केली जाते. तसेच गेल्या काही वर्षांपासून ब्रिमस्टोवॅड प्रकल्प, मिठी नदी रूंदीकरण, पर्जन्यजलवाहिन्या बदल, सात पंपिग स्टेशनची उभारणी अशा विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या कमी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर आमदार अमित साटम यांनी सन २०१० ते २०२० या दहा वर्षात नालेसफाई कामांसाठी केलेल्या खर्चाची माहिती पालिकेकडून मागितली होती. पालिकेच्या पर्जन्यजलवाहिन्या विभागाने दिलेल्या माहितीवरून साटम यांनी पालिकेच्या कारभारावर टीका केली आहे.

    ‘अर्ध्या तासाच्या पावसातही मुंबईची तुंबई होते हे आपण गेल्या अनेक वर्षांपासून पाहत आहोत. पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी गेल्या वर्षी ११४ टक्के तर यंदा १०४ टक्के नालेसफाई झाल्याचा दावा केला आहे. तरीही मुंबई पाण्याखाली जाते आहे. पालिका दरवर्षी नालेसफाईसाठी शंभर कोटी खर्च करते. गेल्या दहा वर्षात नालेसफाईसाठी एक हजार कोटी तर वीस वर्षांत दोन हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. तसेच २००५ च्या पावसानंतर चितळे समितीच्या शिफारशीनुसार ब्रिमस्टोवॅड, नालेरूंदीकरण, पंपिग स्टेशन व इतर कामांसाठी सहा हजार कोटी रुपये खड्ड्यांवर खर्च करण्यात आले आहेत, असा दावा अमित साटम यांनी केला आहे.