एसटीची सेवा बंद झाल्याने बेस्टवर वाढला ताण, गर्दीमुळे मुंबईकरांचे झाले हाल

बेस्टच्या ताफ्यात मदतीला आलेल्या एसटीच्या एक हजार बसेस रविवारपासून बंद(St Bus Service terminated) करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून बेस्टसाठी गर्दी वाढल्याने बेस्टवर ताण आला आहे.

  मुंबई: लॉकडाऊनमध्ये(Lockdown) आधार ठरलेल्या बेस्ट सेवेवर(BEST Bus Service) आता पुन्हा ताण वाढला आहे. बेस्टच्या ताफ्यात मदतीला आलेल्या एसटीच्या एक हजार बसेस रविवारपासून बंद(St Bus Service terminated) करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सोमवारपासून बेस्टसाठी गर्दी वाढल्याने बेस्टवर ताण आला आहे.

  बेस्टच्या परिवहन उपक्रमातील सुमारे ३ हजार बसताफ्यांच्या जोडीला एसटी महामंडळाकडून एक हजार बसचा ताफा सेवेत होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्य़े सध्या सर्वसामान्यांसाठी लोकल बंद आहे. त्यामुळे बेस्ट ही एकमेव आधार ठरली आहे. निर्बंधांत शिथिलता आणली असल्याने सार्वजनिक ठिकाणी प्रवाशांची गर्दी वाढली आहे. त्यात अजूनही सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु झालेली नसल्याने बसचाच आधार घ्यावा लागतो आहे. मात्र महामंडळाने मुंबईकरांना नेमकी गरज असतानाच हा ताफा पुन्हा आपल्याकडे वळवून घेतला आहे.

  महामंडळाने रविवारी जाहीर केलेल्या निर्णयाचा पहिलाच फटका सोमवारी मुंबईकरांना बसला आहे. सोमवारी सकाळपासूनच शहरातील बऱ्याचशा बसथांब्यांवर बसची वाट पाहत उभ्या असलेल्या मुंबईकरांची हतबलता दिसून येत होती. एसटीने त्यांच्या एसटीचा ताफा बेस्ट सेवेतून मागे घेतल्याने मुंबईकर प्रवाशांचे पुरते हाल सुरू झाले आहेत. निर्बंध शिथिलतेमध्ये कार्यालयात ५० टक्के उपस्थितीस अनुमती देण्यात आल्याने अनेकांना कार्यालयात जाण्यासाठी बेस्ट सेवेचा आधार आहे. पण, बेस्टच्या बसमधील सुमारे ३ हजार बसची संख्या वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत अपुरी पडते आहे.

  गेल्या आठवड्यात निर्बंध शिथिलतेमध्ये बेस्ट बसेस १०० टक्के क्षमतेने रस्त्यावर धावत आहेत. मात्र आता बेस्टच्या मदतीसाठी आलेला बेस्टचा ताफा बंद झाल्याने वाढत्या गर्दीचा भार बेस्टला पेलावा लागतो आहे. अपुऱ्या बसेसमुळे यात प्रवाशांनाही त्रास सहन करावा लागतो आहे. यात वाढत्या गर्दीमध्ये कोरोनालाही निमंत्रण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.

  एसटी सेवेच्या खर्चाचा महापालिकेने उचलला भार  
  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेस्टच्या मदतीसाठी गेल्यावर्षी एसटीचा ताफा बेस्टच्या ताफ्यात दाखल झाला. बेस्टच्या सहाय्यासाठी एक हजार बसची सेवा पुरवण्यात आली. त्यासाठी येणारा खर्च मुंबई पालिकेकडून दिला जात होता. त्यामुळे एसटी महामंडळास खर्चाचा भार सहन करावा लागत नव्हता. मात्र तरीही एसटी महामंडळाने सेवा बंद करण्याचा निर्णय का घेतला असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.