लॉकडाऊन काळात सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट, तुम्हीही या चुका करत असाल तर सावधान !

अनेक ग्राहकांना सध्या त्यांच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डच्या तपशीलांसाठी फोन येत असून काहीजण बेमालूमपणे या पाशात अडकत असल्याचं दिसून येतंय. फोन करणारी व्यक्ती बँक मॅनेजर असल्याचं सांगत डेबिट आणि क्रेडीट कार्ड नंबर विचारते. त्यानंतर कार्डवरील चार अंकी नंबर विचारते. लोक त्यांच्या बोलण्यानं प्रभावित होऊन हा नंबर सांगतात आणि लगेचच त्यांच्या खात्यातील पैसे गायब होतात.

मुंबई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊन लावण्यात आला, पण घरी बसल्या बसल्या अनेकजण बँकिंग फ्रॉडची शिकार बनल्याचं आता समोर आलं आहे. ऑनलाईन फसवणूक करण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत शेकडो जणांना या लॉकडाऊनच्या काळात लुबाडलं गेलंय. सायबर क्राईमच्या एकूण गुन्हेगारीमध्ये बँकिंग फ्रॉडचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं समोर आलंय.

नेट बँकिंगसाठी अर्ज केला आणि चांगलाच भुर्दंड पडला

मुलुंडमध्ये राहणारे ग्राफिक डिझायनर विकास प्रफुल्ल भट्ट यांचं बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय या बँकांमध्ये खातं आहे. बँकेतील खेटे कमी करण्यासाठी त्यांना इंटरनेट बँकिंगची गरज होती. त्यासाठी त्यांनी बँक ऑफ बडोदात पत्नीकरवे ऑनलाईन बँकिंगसाठी अर्ज केला. दुसऱ्या दिवशी त्यांच्या पत्नीला नितीन भारद्वाज या नावाने एका व्यक्तीचा फोन आला. आपण बँक ऑफ बडोदाचा मॅनेजर असल्याची बतावणी करत बँक ऑफ बडोदा आणि आयसीआयसीआय या दोन्ही बँकांच्या डेबिट कार्डचे तपशील घेतले. हे तपशील दिल्यानंतर या दोन्ही खात्यातील मिळून ६ लाख ६२ हजार रुपये गायब झाले.

यामुळे विकास यांची कष्टाची कमाई हातोहात गायब झाली. मुलुंड पोलिसांत याची तक्रार करण्यात आली असून पोलीस या घटनेचा तपास करतायत. विकास यांच्याप्रमाणेच अनेक ग्राहकांना सध्या त्यांच्या डेबिट आणि क्रेडीट कार्डच्या तपशीलांसाठी फोन येत असून काहीजण बेमालूमपणे या पाशात अडकत असल्याचं दिसून येतंय. फोन करणारी व्यक्ती बँक मॅनेजर असल्याचं सांगत डेबिट आणि क्रेडीट कार्ड नंबर विचारते. त्यानंतर कार्डवरील चार अंकी नंबर विचारते. लोक त्यांच्या बोलण्यानं प्रभावित होऊन हा नंबर सांगतात आणि लगेचच त्यांच्या खात्यातील पैसे गायब होतात.

सर्व बँकांचे कस्टमर केअर नंबर गुगलवर आहेत. हॅकर्सनी गुगलवर हे नंबर एडिट करून चुकीचे नंबर ठेवले आहेत. त्यामुळे या नंबरवर जेव्हा ग्राहक फोन करतो, तेव्हा तो हॅकर्सना जातो. त्यानंतर हॅकर्स तुम्हाला फोन करतात आणि तुमच्या खात्याशी संबंधित माहिती तुमच्याकडून घेतात. त्यानंतर लोकांच्या बँक खात्यातील पैसे गायब होतात. त्यामुळे आपल्या बँक मॅनेजरला भेटून लोकांनी त्याचा नंबर घ्यावा आणि बँकेचा कस्टमर केअर नंबर मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावा. खात्याच्या प्रतिदिन व्यवहाराची सीमा निश्चित करावी. चुकून तुमचं खातं हॅक झालं, तरी त्या मर्यादेपेक्षा अधिक रकमेचा व्यवहार हॅकर्सना करता येणार नाही

रश्मी करंदीकर, डीसीपी, सायबर क्राईम.

विकास यांच्याप्रमाणे जानेवारी ते ऑक्टोबर या काळात बँकिंग फसवणुकीचे ४५५ जण बळी ठरलेत. त्यातील केवळ १३ प्रकरणं शोधण्यात पोलिसांना यश मिळालंय. लोकांमध्ये जागरुकता नसल्याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार घेत असल्याचं सांगितलं जातंय. कुणीही फोनवर किंवा प्रत्यक्ष आपला डेबिट किंवा क्रेडिट कार्ड नंबर आणि पिन इतरांना न सांगण्याची खबरदारी घेतली, तरी अनेक गुन्हे घडणार नाहीत.