७०४ ऐवजी फक्त १७६ पिलर! कोस्टल रोड ‘एकल स्तंभ’ पद्धतीने समुद्रात हाेणारे हे देशातील पहिले बांधकाम

सागरी किनारा मार्गांतर्गत सुमारे ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २ हजार १०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. तर एकूण १५.६६ किलोमीटर लांबी असणारे आंतरबदल (इंटरचेंज) देखील बांधण्यात येणार आहेत. सामान्यपणे समुद्र, नदी, तलाव इत्यादींवर पुलाचे बांधकाम करताना त्याखाली असणार्‍या खांबांची उभारणी ‘बहुस्तंभीय’ पद्धतीने केली जाते. यात प्रत्येक खांबाच्या खाली आधार देणारे साधारणतः ४ स्तंभ उभारण्यात येतात, मात्र एकल स्तंभ पद्धतीमध्ये खालून वरपर्यंत एकच भक्कम स्तंभ उभारण्यात येतो.

    मुंबई : का्ेस्टल राेड हा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. मुंबईकरांचा प्रवास वेगवान करणार्‍या कोस्टल रोडच्या कामात ‘एकल स्तंभ’ तंत्रज्ञानामुळे ७०४ ऐवजी फक्त १७६ पिलर बांधले जात आहेत. या पर्यावरणपुरक बांधकामामुळे एकूण खर्चात तब्बल १२ कोटींची बचत होणार आहे. अशा प्रकारे ‘एकल स्तंभ’ पद्धतीने समुद्रात हाेणारे हे देशातील पहिले बांधकाम होत आहे

    पालिकेच्या माध्यमातून प्रिंन्सेस स्ट्रिट फ्लायओव्हर ते सी-लिंकपर्यंत १०.५८ किमीचा सागरी मार्ग १२ हजार ७२१ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत आहे. यामध्ये प्रियदर्शनी पार्क ते बडोदा पॅलेसपर्यंतचे काम मेसर्स लार्सन अँड टुब्रो लि. कंपनीला तर वांद्रे वरळी भागाचे काम मेसर्स एससीसी -एचडीसी कंत्राटदारांना संयुक्त भागिदारीत देण्यात आले आहे. या कामासाठी प्रकल्प सल्लागारासोबत मे. एईकॉम एशिया कंपनीची साधारण सल्लागार म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

    यानुसार काम सुरू झाल्यानंतर साधारण सल्लागार आणि आयआयटी मुंबई यांच्या तज्ज्ञांनी प्रकल्पाच्या कामात पुलांचे बांधकाम अनेक स्तंभ पायाऐवजी ‘एकस्तंभी’ तंत्रज्ञानाने करावे असा सल्ला दिला. यामुळे एकूण खर्चात ११ कोटी ९४ लाख रुपयांची बचत झाली आहे. सल्लागाराने या कामासाठी सल्ला देण्यासाठी ३४.९२ कोटी रुपये मागितले होते. मात्र आता कंत्राट रकमेत फेरफार झाल्याने १२ कोटी रुपयांची बचत होणार आहे. या फेरफारीसंदर्भातील प्रस्तावाला आज स्थायी समितीत मंजुरी मिळाल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. दरम्यान, साधारण सल्लागाराने आपल्या शुल्कात ५ कोटी ९१ लाख रुपयांची शुल्कवाढ मागितली आहे.

    असे हाेणार काम

    सागरी किनारा मार्गांतर्गत सुमारे ३४ मीटर रुंदीचे व सुमारे २ हजार १०० मीटर लांबीचे पूल बांधण्यात येणार आहेत. तर एकूण १५.६६ किलोमीटर लांबी असणारे आंतरबदल (इंटरचेंज) देखील बांधण्यात येणार आहेत. सामान्यपणे समुद्र, नदी, तलाव इत्यादींवर पुलाचे बांधकाम करताना त्याखाली असणार्‍या खांबांची उभारणी ‘बहुस्तंभीय’ पद्धतीने केली जाते. यात प्रत्येक खांबाच्या खाली आधार देणारे साधारणतः ४ स्तंभ उभारण्यात येतात, मात्र एकल स्तंभ पद्धतीमध्ये खालून वरपर्यंत एकच भक्कम स्तंभ उभारण्यात येतो.

    सल्लागाराची राहणार जबाबदारी

    या कामात पूल अभियंता व भूतज्ज्ञ अभियंता यांचा समावेश असलेली टीम कामाच्या रचनात्मक आराखड्यांना मंजुरी देणार आहे. याशिवाय युरोपीय अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आवश्यकतेनुसार देखरेख ठेवणे, कामाच्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहणे अशी जबाबदारी सल्लागारावर राहणार आहे. या एक पिलर बांधकामामुळे मनुष्यबळ आणि पैशांची बचत होत असून पर्यायाने पर्यावरण संवर्धनही होणार आहे.