शरद पवारांच्या १६५ पानांच्या पत्रातील दोनच पाने व्हायरल केली जात आहेत; नवाब मलिकांचा आरोप

मुंबई : भाजप हा शेतकऱ्यांचा पक्ष नसून शेतकऱ्यांच्या मालाची लूट करणारा पक्ष असल्याची घणाघाती टीका राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी केली आहे. शरद पवारांच्या १६५ पानांच्या पत्रातील दोनच पाने व्हायरल केली जात असल्याचा आरोपही मलिक यांनी केला आहे.

केंद्रसरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात मागच्या ११ दिवसांपासून दिल्ली येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ८ डिसेंबर रोजी भारत बंद पुकारण्यात आला आहे. महाविकास आघाडीमधील तीनही पक्षांनी या भारत बंदला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. तसेच सामान्य लोकांनी या बंदला उस्फूर्त प्रतिसाद देण्याचे आवाहनही नवाब मलिक यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलनाला पाठिंबा देताच भाजपने शरद पवार हे कृषीमंत्री असतानाचे एक पत्र व्हायरल केले आहे. खरंतर पवारांनी तेव्हा सर्वसमावेशक आणि व्यापक अशा ‘Model APMC Act’ साठी राज्यांना सूट दिली होती. मात्र, मोदी सरकारने आणलेल्या कृषी कायद्यामध्ये राज्यांना आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोणतेही अधिकार देण्यात आलेले नाहीत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

शरद पवार कृषीमंत्री असताना त्यांनी कोणताही निर्णय एकट्याने घेतला नव्हता. निर्णय घेत असताना त्यांनी राज्याचे म्हणणे ऐकून घेतले तसेच केंद्राचा कायदा सरसकट न लादता राज्यांनाही त्यांच्यापद्धतीने बदल करण्याचे अधिकार दिले. मोदी सरकारने आणलेल्या नव्या कायद्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांना निष्प्रभ केले आहे. तसेच हमीभावाबद्दल कोणतेही आश्वासन दिलेले नाही. शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केल्यानंतर मोदी सरकार हमीभाव कायद्यात अंतर्भूत असल्याचा शब्द देत आहे. मात्र, सरकार हे शब्दांनी नाही तर कायद्याने चालते, त्यामुळे कायद्यात हमीभावाचे आश्वासन असायला पाहीजे होते असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

भाजपकडून आता पवारांच्या ज्या पत्राचा उल्लेख करण्यात येत आहे, ते पत्र १६५ पानांचे आहे. मात्र, जाणीवपूर्वक त्यातील दोनच पाने व्हायरल केली जात असून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पवारांनी राज्यांना लिहिलेले पत्र हे सूचक होते, ते निर्देश नव्हते. एपीएमसीचे अधिकार केंद्राकडे घेण्यास पवार कधीही तयार नव्हते.