विरोधकांना समजले असेल की, आम्ही हिंदुत्त्व सोडलेले नाही; मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

प्राचीन मंदिरे हा राज्याचा सांस्कृतिक वारसा असून हे वैभव जपण्याच्या दृष्टीने या मंदिरांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी देण्यात येईल, यावरुन विरोधकांना समजले असेल की, आम्ही हिंदुत्त्व सोडलेले नाही आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला. मंगळवारी विधानसभेत ते बोलत होते.

  • स्वतंत्र निधी देवून प्राचीन मंदिरांचे संवर्धन करणार असल्याची दिली माहिती

मुंबई (Mumbai).  प्राचीन मंदिरे हा राज्याचा सांस्कृतिक वारसा असून हे वैभव जपण्याच्या दृष्टीने या मंदिरांच्या संवर्धनासाठी राज्य शासनाकडून स्वतंत्र निधी देण्यात येईल, यावरुन विरोधकांना समजले असेल की, आम्ही हिंदुत्त्व सोडलेले नाही आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला. मंगळवारी विधानसभेत ते बोलत होते.

पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री बोलत होते. ते पुढे म्हणाले, मंदिरांचे पावित्र्य, स्वच्छता सोबतच येणार्‍या भाविकांसाठी सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी देण्यात येईल. टप्प्या टप्प्याने प्राचीन मंदिरांचा विकास करण्यात येणार असून त्यात कोणत्या मंदिरांचा समावेश करायचा याबाबत सभागृहाच्या सदस्यांनी सूचना कराव्यात, असेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.

कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही असे सांगून ते पुढे म्हणाले की, कोरोनाचे संकट संपूर्ण जगालाच नवीन असताना राज्य शासनाने अतिशय उत्कृष्टरित्या यासंदर्भातील काम हाताळले. त्याची दखल जगाने घेतली. कोरोना प्रतिबंधासाठी राबवलेल्या धारावी मॉडेलचे कौतुक जागतिक आरोग्य संघटनेने केले. माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी मोहिम राबविणारे आपले राज्य संपूर्ण देशात पहिले किंवा एकमेव राज्य आहे. यामध्ये आरोग्य सेविका, अंगणवाडीसेविका, आरोग्य कर्मचारी, स्वंयसेवी संस्था, पोलीस शासकीय यंत्रणा या सर्वांनी अतिशय चांगले काम केले. या मोहिमेमुळे महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा तयार झाला. सहव्याधी असलेल्या नागरिकांची माहिती कळल्यामुळे त्यांच्याकडे आपण व्यवस्थित लक्ष देऊ शकलो. लोकांची ऑक्सीजन पातळी समजल्यामुळे काही जणांचे प्राण वाचवू शकलो, असेही ते म्हणाले.

पर्यावरणाचे संरक्षण करतच राज्य शासनाचे विकासाला प्राधान्य राहील असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शहरांच्या विकासासाठी जंगले नाहिशी होत असताना शहरातील जंगल जपण्याचा प्रयत्न आरेच्या निर्णयातून झाला. जिथे वाईल्ड लाईफ अर्थात वन्यजीव आहेत त्या जंगलांना आपण संरक्षित करत आहोत, तेथील जंगलाचे संवर्धन करण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.