शांघाय येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची राज्यातील युवक-युवतींना संधी, मंत्री नवाब मलिक यांची माहिती

जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी करण्यात येते. २०२२ मध्ये शांघाय (चीन) येथे ही स्पर्धा आयोजित होणार असून त्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ४७ क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या धर्तीवर जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

    मुंबई : शांघाय (चीन) येथे पुढील वर्षी होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची राज्यातील उमेदवारांना संधी उपलब्ध झाली असून या स्पर्धेमध्ये निवडीसाठी जिल्हा, विभाग तसेच राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या स्पर्धेच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींना त्यांचे कौशल्य दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. स्पर्धेस उत्स्फुर्त प्रतिसाद देत राज्यातील तब्बल २२ हजार ०९० युवक-युवतींनी यात सहभाग घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.

    विविध ४७ क्षेत्रातील कौशल्यावर आधारित ही स्पर्धा होत आहे. सर्वाधिक २ हजार ११८ अर्ज इलेक्ट्रीकल इन्स्टॉलेशनसाठी आले असून ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजीसाठी १ हजार २३१, सीएनसी मिलिंगसाठी २६३, सीएनसी टर्निंगसाठी ४७९, इलेक्ट्रॉनिक्ससाठी १ हजार ०८६, फॅशन टेक्नॉलॉजीसाठी ४५०, हेल्थ आणि सोशल केअरसाठी ५४२, आयटी नेटवर्क केबलसाठी ३१७, मेकॅनिकल इंजिनिअरींगसाठी ३४४, प्लंबिंग आणि ॲम्प हिटींगसाठी २९५, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंगसाठी ३८४ तर वेल्डींगसाठी १ हजार ०११ युवकांनी कौशल्य सादरीकरणासाठी नोंदणी केली आहे.

    याशिवाय ३डी डीजीटल गेम आर्ट, ऑटोबॉडी रिपेअर, ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी, बेकरी, ब्युटी थेरपी, ब्रुकलेयींग, कॅबिनेट मेकींग, कार पेंटींग, कारपेन्ट्री, क्लाऊड कॉम्पुटींग, सीएनसी मिलींग, कॉन्क्रींट कन्स्ट्रक्शन वर्क, कुकींग, सायबर सिक्युरीटी, फ्लॉरिस्ट्री, ग्राफीक डिझाईन टेक्नोलॉजी, हेअर ड्रेसिंग, इंडस्ट्रीयल कंट्रोल, ज्वेलरी, जॉईनरी, लँडस्केप गार्डनिंग, मेकॅट्रॉनिक्स, प्लंबिंग, प्रिंट मेडीया टेक्नॉलॉजी, प्रोटोटाईप मॉडेलिंग, रेस्टॉरंट सर्व्हीस, वॉटर टेक्नॉलॉजी, वेब टेक्नॉलॉजी आदी सेक्टरमधील आपल्या कौशल्यांचे प्रदर्शन करण्यासाठी युवक-युवतींनी नोंदणी केली आहे, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

    विविध जिल्ह्यातून स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. यामध्ये अहमदनगर (८६३), अकोला (३८३), अमरावती (१ हजार ३३४), औरंगाबाद (६६१), बीड (१८८), भंडारा (३२८), बुलढाणा (803), चंद्रपूर (१ हजार ०४७), धुळे (४८३), गडचिरोली (२७६), गोंदीया (८५३), हिंगोली (६७), जळगाव (१ हजार ०६३), जालना (192), कोल्हापूर (३९२), लातूर (३५१), मुंबई (१ हजार ५२९), मुंबई उपनगर (५४), नागपूर (१ हजार ०५८), नांदेड (२२१), नंदुरबार (२९७), नाशिक (१ हजार २८६), उस्मानाबाद (२८४), पालघर (९९), परभणी (१०५), पुणे (१ हजार २७३), रायगड (२९८), रत्नागिरी (१३३), सांगली (420), सातारा (६४९), सोलापूर (770), सिंधुदूर्ग (१०३), ठाणे (१ हजार ४८४), वर्धा (१ हजार १३१), वाशिम (१६४), यवतमाळ (१ हजार ४४८) याप्रमाणे युवक-युवतींनी सहभाग घेतला आहे , असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

    जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन दर दोन वर्षांनी करण्यात येते. २०२२ मध्ये शांघाय (चीन) येथे ही स्पर्धा आयोजित होणार असून त्याच्या पूर्वतयारीच्या दृष्टीने ४७ क्षेत्रांशी संबंधित कौशल्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या धर्तीवर जिल्हा, विभाग, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर कौशल्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यातून निवड केलेल्या उमेदवारांची नावे पुढील जागतिक नामांकनासाठी पाठविण्यात येणार आहेत. यातील पहिल्या टप्प्याची सुरुवात जिल्हास्तरीय कौशल्य स्पर्धेच्या स्वरूपात १७ व १८ ऑगस्ट २०२१ रोजी संपन्न झाली.

    या कालावधीत प्रत्येक जिल्ह्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच तांत्रिक विद्यालयांच्या ठिकाणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यानंतरच्या टप्प्यात विभागीय स्पर्धा 23 व 24 ऑगस्ट 2021 रोजी होणार आहे. विभागीय विजेते उमेदवार 3, 4 व 5 सप्टेंबर 2021 रोजी मुंबई येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकतात. राज्यस्तरावरील विजेते उमेदवार डिसेंबर 2021 मध्ये बेंगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेमध्ये सहभागासाठी पात्र ठरतील. देशपातळीवर निवड झालेल्या उमेदवारांना जागतिक कौशल्य स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संधी मिळेल. प्रत्येक टप्प्यावरून पात्र होणाऱ्या उमेदवारांना शासनामार्फत मोफत प्रशिक्षण व रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.

    यापूर्वी जागतिक स्तरावरील ४५ व्या जागतिक कौशल्य स्पर्धेचे आयोजन कझान (रशिया) येथे करण्यात आले होते. यामध्ये भारतातून एकूण ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता, त्यात महाराष्ट्रातून ७ आणि फ्युचर स्किलसाठी १ स्पर्धक अशा एकूण ८ स्पर्धकांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत भारतीय संघाने एक सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य आणि १५ उत्कृष्ठ सादरीकरणाची पदके अशा एकूण १९ पदकांवर आपले नाव कोरून ६३ देशांमधून १३ व्या स्थानी येण्याचा बहुमान पटकावला होता. तसेच, महाराष्ट्राने १ कांस्य आणि ३ उत्कृष्ठ सादरीकरणाची अशी एकूण ४ पदके मिळविली होती. पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेतही राज्यातील अधिकाधिक युवक-युवतींना उत्कृष्ट संधी मिळावी यासाठी विविध स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याचे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.