मराठा आरक्षणावरील स्थगितीवरून  विरोधीपक्ष आणि समन्वयकांची राज्य सरकारवर टीका

क दिवस आधी वकिलांना बोलावले जाते आणि आम्ही मराठा आरक्षणासाठी लढत आहोत, हे दाखवून आता चालणार नाही. मराठा समाजातील तरुणाई आता संतप्त झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.

 

मुंबई: मराठा आरक्षणावरील स्थगिती हटवण्यास सर्वोच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर हल्ला चढवला आहे. मराठा आरक्षणप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका केली आहे. ते म्हणाले की,तारीख आल्यावर एक दिवस आधी वकिलांना बोलावले जाते आणि आम्ही मराठा आरक्षणासाठी लढत आहोत, हे दाखवून आता चालणार नाही. मराठा समाजातील तरुणाई आता संतप्त झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे, असे मत दरेकर यांनी व्यक्त केले आहे. ‘वकील मंडळी युक्तीवाद करतील. पण सरकार म्हणून काही निर्णय घेणे, सर्वोच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडण्यात सरकार अपयशी ठरत आहे. मराठा समाजाच्या भरती प्रक्रियेबाबत राज्य सरकार दुसरा मार्ग काढू शकते मात्र तसे होताना दिसत नाही’, असेही दरेकर म्हणाले.

सरकार कमी पडले : विनोद पाटील

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारने आधीच रणनिती आखायला हवी होती. लॉकडाऊनपूर्वीच योग्य खबरदारी घेतली असती, संपूर्ण तयारी केली असती, तर आज मराठा समाजावर ही वेळ आली नसती, अशा शब्दात मराठा मोर्चाचे समन्वयक आणि याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. आता विशेष बाब म्हणून राज्य सरकारने नवा मार्ग काढायला हवा. वेगळा पर्याय तयार करुन मराठा समाजातील तरुणांची रखडलेली भरती आणि विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावे, अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे.