विरोधकांनी विधानसभेत उचलून धरला ‘त्या’ आत्महत्येचा मुद्दा, उपमुख्यमंत्र्यांनी दिलं आयोगाच्या अध्यक्षांसोबत चर्चेचे आश्वासन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(MPSC Exam) परिक्षा घेवूनही उत्तीर्ण होवूनही हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याबाबत विधानेसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी स्थगन प्रस्तावाव्दारे विषय उपस्थित केला होता.

  मुंबई :  राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षा दोनदा उत्तीर्ण झाल्यानंतरही नियुक्ती न दिल्याने स्वप्निल लोणकर या विद्यार्थ्यांने आत्महत्या(Swapnil Lonkar Suicide) केल्या प्रकरणी विधानसभेत पडसाद उमटले. या प्रकरणी आज सदनाचे कामकाज पूर्ण होताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या(MPSC) आयोगाच्या अध्यक्षांसोबत बैठक घेवून चर्चा करून मार्ग काढण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी विधानसभेत दिली.

  महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षा घेवूनही उत्तीर्ण होवूनही हजारो विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याबाबत विधानेसभेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थगन प्रस्तावाव्दारे विषय उपस्थित केला होता.

  हजारो पालक आणि विद्यार्थ्यांचा आक्रोश
  फडणवीस यांनी यावेळी लोणकर यांच्या सुसाईड नोटमधील मजकूर वाचून दाखवत या प्रकरणाबाबत संवेदनशीलपणे सरकारने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सांगितले. लोणकर यांच्या आईने माध्यमांसमोर व्यक्त केलेल्या भावना हजारो पालक आणि विद्यार्थ्यांचा आक्रोश व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले. त्यानंतर सरकारने आयोगांचे कामकाज स्वायत्तपणे सुरू असले तरी अशा संवेदनशील स्थितीत हस्तक्षेप करून मार्ग काढण्याबाबत कार्यवाही केली पाहीजे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी फडणवीस यांच्या प्रमाणेच सांगत हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असताना सरकारने या विषयात लक्ष देण्याची गरज असल्याचे सांगितले.

  आयोगाच्या अध्यक्षांसोबत तातडीने बैठक
  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदनात याबाबत उत्तर देताना सांगितले की, राज्य लोकसेवा आयोगाच्या परिक्षांबाबत मे महिन्यातच मुख्यमंत्र्यानी अध्यक्षांशी चर्चा करून सद्यस्थितीत कश्या प्रकारे परिक्षा आणि अन्य कार्यवाही करता येईल याबाबत सूचना केल्या होत्या. मात्र कोरोना कोविड-१९ च्या काळात अनेक अडचणी प्रमाणेच न्यायालयीन आदेशांमुळेही काही विषयांत निर्णय़ घेताना विलंब झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र या संदर्भात आज कामकाज संपल्यानंतर आयोगाच्या अध्यक्षांसोबत तातडीने बैठक घेवून सकारात्मक निर्णय घेण्याबाबत चर्चा करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्र्यानी सांगितले.

  यावेळी स्वप्निल लोणकर यांच्या कुटुंबियांना सहानुभुतीपूर्वक मदत करण्याबाबत निर्णय घेण्याचेही आश्वासन त्यानी दिले. त्यांनतर पुढील कामकाज पुकारण्यात आले मात्र विरोधी सदस्यांनी या मुद्द्यावर समाधान झाले नसल्याचे सांगत गोंधळ घातला आणि घोषणाबाजी केली. त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की सदस्यांच्या  तीन मुद्यांची उत्तरे मिळाली पाहिजेत. त्यावर आयोगाशी चर्चा केल्यानंतर सरकार याबाबत माहिती देणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यानी सांगितले.