प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

मुंबईचे मूळ रहिवासी असलेले कोळी बांधव वर्षानुवर्षे फुटपाथवर मासेविक्रीचा व्यवसाय करत असून त्यांना परवाना देण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिश मकवानी यांनी विधी समितीत केली.

    मुंबई (Mumbai). मुंबईचे मूळ रहिवासी असलेले कोळी बांधव वर्षानुवर्षे फुटपाथवर मासेविक्रीचा व्यवसाय करत असून त्यांना परवाना देण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नगरसेवक अनिश मकवानी यांनी विधी समितीत केली.

    मुंबई महापालिकेने सर्वेक्षण करून पदपथावर फेरीचा व्यवसाय करणाऱ्यांना जागा आखून दिल्या, पण मुंबईचे निर्माते आणि मूळ रहिवासी असलेले कोळी बंधू-भगिनी पदपथावर लपूनछपून व्यवसाय करत आहेत. महापालिकेतर्फे त्यांच्यावर अनेकदा कारवाईही करण्यात येते. त्यावेळी त्यांचे फार मोठे नुकसान होते. कोळी बांधवांची अशी अवस्था योग्य नाही. जर फेरीवाल्यांचे सर्वेक्षण होते. त्यांना जागा आखून दिल्या जातात, तर मासेविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कोळी बंधू-महिलांना जागा आखून द्यावी आणि त्यांना परवानाही देण्यात यावा, अशी मागणी मकवानी यांनी केली आहे.

    मकवानी यांच्या मागणीला पाठिंबा देतानाच काही नगरसेवकांनी त्यांना शीतपेट्या देण्याचीही मागणी केली. कोळीबांधव विक्री झाल्यानंतर शिल्लक राहिलेले मासे बर्फात ठेवतात, मात्र बर्फ वितळून गेल्यानंतर मासे खराब होतात. यात कोळी बांधवांचे नुकसान होते. त्यांना शीतपेट्या देण्यात याव्यात अशी मागणी नगर सेवकांकडून करण्यात आली.