अन्यथा कोविड सेवा बंद करू ! ; अस्मी या इंटर्न डॉक्टर संघटनेचा आंदोलनाचा इशारा, दिलं हे ‘कारण’

मुंबई: मागील काही महिन्यांपासून मानधनात वाढ मिळण्याबाबत वारंवार राज्य आराेग्य विभागाला पत्रव्यवहार करण्यात आला आहे, परंतु आराेग्य विभाग याकडे दुर्लक्ष करत आहे. यामुळे मानधनात वाढ हाेत नसल्याने कोविड सेवा बंद करू असा इशारा अस्मी या इंटर्न डॉक्टर संघटनेने दिला आहे.

मुंबईतील पालिकेच्या इंटर्न डॉक्टरांना ५० ते ६० हजार मानधन देत आहेत. तसेच पुण्यातील राज्य सरकारच्या रुग्णालयातही इंटर्न डॉक्टरांच्या मानधनाचा प्रश्न सुटला आहे. मात्र मुंबईतील आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील इंटर्न डॉक्टरांचा प्रश्न प्रलंबित असून तो सोडविण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून आश्वासने देण्यात येत आहेत. मात्र राज्य सरकार याबाबत ठाेस निर्णय घेत नाहीये, याशिवाय अजित पवार यांनी डिसेंबर २०२० पर्यंत प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले मात्र अजूनही हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यामुळे १८ जानेवारीपर्यंत आम्हाला लेखी आश्वासन न मिळाल्यास आम्ही कोविड सेवा बंद करू असे अस्मी या इंटर्न डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.