नाहीतर जनता शिवसेनेला कायमची क्वारंटाईन केल्याशिवाय राहणार नाही

भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाचे कारण देत स्वत:ला विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल टिका केली आहे. परमवीर सिंग यांचे पत्र मिळण्याच्या सुमारास आदित्य ठाकरे यांच्या कोरोनाच्या लागणीची बातमी येणे हा राजकीय योगायोग असू नये.

  मुंबई (Mumbai).  भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाचे कारण देत स्वत:ला विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल टिका केली आहे. ते म्हणाले की, परमवीर सिंग यांचे पत्र मिळण्याच्या सुमारास आदित्य ठाकरे यांच्या कोरोनाच्या लागणीची बातमी येणे हा राजकीय योगायोग असू नये. नाहीतर जनता शिवसेनेला कायमची क्वारंटाईन केल्याशिवाय राहणार नाही.

  युवा मोर्चाचे तीव्र आंदोलन
  भाजप प्रदेश कार्यालयासमोर आज गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी युवा मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यांनतर पत्रकारांशी बोलताना उपाध्ये म्हणाले की,  कॉंग्रेस पक्षाने परमवीर सिंग यांच्या पत्राचा संदर्भ गुजरातमधील भूतकाळात घडलेल्या घटनांशी जोडणे हास्यास्पद आहे. कालपर्यंत ज्या पोलीस अधिका-यांना वाचविण्यासाठी आघाडी सरकारचे घटकपक्ष पुढाकार घेत होते तेच आता त्यांना सरकार पाडण्यासाठी कारस्थान करत असल्याचा ठपका कसा ठेवू शकतात असा सवाल त्यानी केला.

  भाजप शांत बसणार नाही
  उपाध्ये म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाला या सरकारमध्ये स्थान नाही मात्र त्यांचे सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी या विषयावर मौन बाळगून असताना कॉंग्रेसचा सत्ता वाचविण्याचा केविलवाणा आटापिटा सुरू असल्याचे दिसून येत आहे. ते म्हणाले की मतदारांचा अवमान करून स्थापन केलेल्या खंडणीखोरांच्या सरकारला क्षणभरही सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.
  यासाठी जनतेच्या प्रश्नावर भाजपने आज राज्यभर आंदोलने केली आहेत. या पूर्वी राठोड प्रकरणातही मुख्यमंत्री गुन्गहेगारांना पाठिशी घालताना दिसले आता देखील २४ तास होवून गेले तरी त्यांची काही प्रतिक्रिया आली नाही त्यामुळे गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही.