P T hospital administration Mujorgiri allegation of staff
पी.टी. हॉस्पिटल रुग्णालय प्रशासनाची मुजोरगिरी, कर्मचाऱ्यांचा आरोप

आता कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत प्रत्येक वॉर्डमध्ये चार कामगार कार्यरत आहेत. याबाबत व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता, व्यवस्थानाकडून धमविले जात असल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत, तसेच कर्मचाऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूकही व्यवस्थापनाकडून दिली जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.

  • कर्मचाऱ्यांनी घेतली राष्ट्रवादी काँग्रेस खासदार सुप्रिया सुळे व महापालिका आयुक्तांची भेट

मुंबई: मुंबईतील नरिमन पॉईंट येथील पारशी जनरल (पी.टी.) रुग्णालय व्यवस्थापनाकडून कर्मचाऱ्यांची छळवणूक होत असल्याचा आरोप कर्मचारीवर्गाकडून केला जात आहे. याबाबत बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांची कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या, शिवाय मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांचीही भेट घेत रुग्णालयातील परिस्थितीबाबत निवेदन दिले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ॲड. अमोल मातेले यांनी सांगितले.

मुंबईतील नरिमन पॉईंट येथील पारशी जनरल (पी.टी.) रुग्णालय व्यवस्थापन कर्मचाऱ्यांचा छळ करत असल्याचे कर्मचारी सांगत आहेत. या रुग्णालयाच्या प्रत्येक वॉर्डमध्ये आठ कामगार कार्यरत होते. परंतु आता कर्मचाऱ्यांची संख्या कमी करत प्रत्येक वॉर्डमध्ये चार कामगार कार्यरत आहेत. याबाबत व्यवस्थापनाकडे विचारणा केली असता, व्यवस्थानाकडून धमविले जात असल्याचा आरोप कर्मचारी करत आहेत, तसेच कर्मचाऱ्यांना दुय्यम दर्जाची वागणूकही व्यवस्थापनाकडून दिली जात असल्याचेही सांगण्यात येत आहे.

कोरोना काळात कामगारांनी रुग्णसेवा केली परंतु कर्मचाऱ्यांना मात्र पगार तर दिला नाहीच पण कामावरुन कमी करण्याबाबतच्या धमक्या दिल्या जात असल्याचे कर्मचारी सांगतात. कोविड दरम्यान कर्मचाऱ्यांना कोणतीही सुविधा दिली नाही, प्रवास भत्ता, इतर भत्ते व पीपीई कीट ही दिली नसल्याचे कर्मचारी सांगतात.

जीव धोक्यात घालून कर्मचाऱ्यांनी काम केले परंतु रुग्णालय प्रशासनाने मात्र सावत्रपणाची वागणूक दिली असल्याचे कर्मचारी सांगतात, ज्यामुळे बुधवारी कर्मचाऱ्यांनी श्रमिक उत्कर्ष संघटनेच्या मार्गदर्शनाखाली खासदार सुप्रिया सुळे व पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची भेट घेऊन रुग्णालयातील ढिसाळ कारभाराबाबत निवेदन दिले.