गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी पालिकेची तयारी ; चौपाट्या, नैसर्गिक विसर्जनस्थळी सुविधेसाठी लगबग

गणेश विसर्जन सोहळ्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिका ‘स्लॉट बूकिंग’ सुविधा सुरू करणार आहे. चौपाट्या आणि नैसर्गिक विसर्जन ठिकाणांसाठी ही सोय उपलब्ध करण्यात येणार असून यानुसार विसर्जनासाठी वेळ मिळाल्यानंतर तासाभरात भाविकांना अपेक्षित ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी नेता येणार आहे, अशी माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.

  मुंबई – सलग दुसर्‍या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी पालिकेची तयारी सुरू असून चौपाट्या, नैसर्गिक विसर्जनस्थळी सुविधेसाठी पालिका प्रशासनाची लगबग सुरू झाली आहे.

  गणेश विसर्जन सोहळ्यात होणारी गर्दी टाळण्यासाठी पालिका ‘स्लॉट बूकिंग’ सुविधा सुरू करणार आहे. चौपाट्या आणि नैसर्गिक विसर्जन ठिकाणांसाठी ही सोय उपलब्ध करण्यात येणार असून यानुसार विसर्जनासाठी वेळ मिळाल्यानंतर तासाभरात भाविकांना अपेक्षित ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जनासाठी नेता येणार आहे, अशी माहिती उपायुक्त हर्षद काळे यांनी दिली.

  गेल्या वर्षी कोरोनाचा कहर असताना गर्दी टाळण्यासाठी गोरेगाव चौपाटीवर सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांच्या नियोजनाने स्लॉट बूकिंग सुविधा प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आली. हा उपक्रम यशस्वी ठरल्यामुळे यावर्षी व्यापक प्रमाणात हा सुविधा देण्यात येणार आहे. यासाठी पालिकेच्या माध्यमातून एक सॉफ्टवेअर तयार केले जात आहे.

  या सॉफ्टवेअरवर ऑनलाइन बूकिंग करता येणार असून घरगुती आणि सार्वजनिक मंडळांच्या मूर्तीचे विसर्जनही करता येणार आहे. यामुळे शेवटच्या दिवशी विसर्जनासाठी होणारी गर्दी टाळता येणार आहे.

  पालिकेचे आवाहन

  दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी मुंबईच्या चौपाट्या आणि नैसर्गिक विसर्जनस्थळी मोठी गर्दी होते. मात्र यावर्षीदेखील गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने गणेशभक्तांनी ‘स्लॉट बूकिंग’ करूनच विसर्जनासाठी यावे असे आवाहन मंडळे, भाविकांना पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.