परब चक्रव्युहात! आरटीओत बदली घोटाळा; परिवहन मंत्र्यांची लोकायुक्त चौकशी

नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप-परिवहन अधिकारी असलेले खरमाटे हे परब यांचे वाझे असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ते परब यांचे जवळचे मानले जातात. परब आणि खरमाटे यांनी संगनमताने कोट्यवधी रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.

    मुंबई : राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचालनालयाने नोटीस बजावलेली असतानाच त्यांना पुन्हा एक धक्का बसला आहे. परिवहन खात्यातील परब यांच्या मर्जीतील एका अधिकाऱ्याच्या घरावर ईडीने छापे मारल्यानंतर आता बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याने परब यांच्या सांगण्यावरून लाखो रुपयांचा घोटाळा करत विभागात केलेल्या बदल्यांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी लोकायुक्तांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्या संदर्भात उद्या सुनावणी होणार असून या सुनावणीला जबाब नोंदविण्यासाठी तक्रारदार डॉ. किरीट सोमैय्या यांना लोकायुक्तांकडून हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे.

    मर्जितील अधिकाऱ्याशी संगमनत

    नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागामधील उप-परिवहन अधिकारी असलेले खरमाटे हे परब यांचे वाझे असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. ते परब यांचे जवळचे मानले जातात. परब आणि खरमाटे यांनी संगनमताने कोट्यवधी रुपये जमवले आणि आपसात वाटून घेतले, असा आरोप सोमैय्या यांनी केला होता. त्यांनी दोन-दोन महिन्यांनी अनेक अधिकाऱ्यांची बदली केली आणि 25-30 लाख रुपयांपासून एक कोटी रुपये घेऊन प्रमोशन केले असल्याचेही सोमैय्या यांनी आपल्या आरोपात म्हटले होते.

    एवढी संपत्ती कुठून आली?

    परिवहन विभागातील अधिकारी बजरंग खरमाटे हा अनिल परबांचा सचिन वाझे आहे. त्याच्या द्वारे एका एका बदलीसाठी 25 लाखापासून सव्वा कोटीपर्यंत वसूल केले. त्यामुळे ईडीने बजरंग खरमाटे यांच्या वास्तूंवर धाडी टाकल्या. किती शोरूम, किती फ्लॅट, किती बंगलो, इतकी संपत्ती आली कुठून? परबांची संपत्तीही आपण पाहात आहात. हा पैसा कुठून आणला? सचिन वाझेकडून की या बदल्यांमधून? असा सवाल सोमय्यांनी केला.

    ईडी चौकशीला पाठ; 14 दिवसांची मुदत मागितली

    अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने परिवहन मंत्री अनिल परब यांना मंगळवारी चौकशीसाठी बोलाविले होते. मात्र, परब यांनी ईडीला पाठ दाखविली. मंत्री असल्यामुळे अनेक कार्यक्रम आधीच ठरले आहेत. त्यामुळे चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नाही, असे कारण देत परब यांच्याकडून 14 दिवसांची मुदत मागण्यात आली आहे. परब यांना ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याकरिता नोटीस बजावली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास परब यांना ईडी कार्यालयात पोहोचायचे होते. मात्र, परब ईडी कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. त्यांनी अवधी मागून घेतला असून ईडीने त्याला मंजुरी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. परब यांनी ईडीला एक पत्र पाठवून आज चौकशीसाठी उपस्थित राहू शकणार नसल्याचे कळवले. मंत्री असल्यामुळे आजचे कार्यक्रम अगोदरच ठरले आहेत. ते रद्द करता येणार नाहीत. त्यामुळे मला 14 दिवसांचा अवधी देण्यात यावा, असे परब यांनी पत्रात म्हटले आहे. ईडीनेही परब यांचे पत्र स्वीकारले आहे.

    मी चार महिन्यापूर्वी राज्यपालांकडे तक्रार केली होती. उद्धव ठाकरे आणि त्यांच्या टीमने अनेक घोटाळे केले आहेत. त्यापैकी एक हा घोटाळा आहे. राज्यपालांनी लोकायुक्तांना त्याची चौकशी करण्यास सांगितले होते. आता चौकशी सुरू होत आहे. नवीन लोकायुक्त आलेले आहेत. गुरुवारपासून चौकशी सुरू होणार आहे.

    - किरीट सोमय्या, भाजपा