परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बचा ‘बुमरँग’ होण्याची शक्यता?; संजय पांडे यांना राज्य सरकारकडून चौकशीचे आदेश

  किशोर आपटे, मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्य पाच जणांवर सीबीआयने गुन्हा नोंदवून छापेमारी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या  जाणकार नेत्यानी या सर्व घडामोडीमागे भारतीय जनता पक्षाच्या दबावतंत्राच्या राजकारणाचा भाग असल्याचे सांगितले आहे. या दबाव तंत्राला कश्या प्रकारे तोंड द्यायचे याची सारी कल्पना महाविकास आघाडीच्या नेत्यांना असून त्याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासमवेत सविस्तर चर्चा देखील झाली आहे, असे सूत्रांनी सांगितले. गृहविभागातील सूत्रांच्या मते परमबीर सिंग यांच्या त्या लेटरबॉम्ब मधील दुसऱ्या भागात जे उल्लेख करण्यात आले होते त्याबाबत अद्याप दखल घेण्यात आली नाही. मात्र ते उल्लेखच राज्य सरकारच्या पथ्यावर पडणारे असल्याने लवकरचं सिंग यांच्यावर लेटरबॉम्बचा ‘बुमरँग’ देखील होण्याची शक्यता आहे.

  पुढील रणनीतीबाबत सविस्तर चर्चा

  काल दक्षीण मुंबईतील ज्ञानेश्वरी शासकीय निवासस्थानी सीबीआयने छापा मारला आणि सीसीटिव्ही फुटेजसह अनेक महत्वाच्या दस्तावेजांची जमवाजमव करून घेवून गेले. त्याच ज्ञानेश्वरी शेजारी असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवास स्थानी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात पुढील रणनीतीबाबत सविस्तर चर्चा झाली असल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गृहमंत्री वळसे पाटील शनिवारी पुणे जिल्ह्यातील त्यांच्या मतदारसंघात कोविड स्थितीच्या पाहणीसाठी दौ-यावर जाणार होते, मात्र छापामारी आणि गुन्हा नोंदविल्याच्या घटनेनंतर त्यांनी हा दौरा रद्द केला आणि वर्षा निवासास्थान गाठले. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे यांच्या मार्फत १०० कोटी खंडणी गोळा करण्याचा आदेश दिल्याचा आरोप करणारे जे पत्र मुख्यमंत्र्याना पाठवले आहे त्यात खंडणी प्रकरणाशिवाय आणखी एका मुद्याचा उल्लेख होता ज्यावरून सिंग आणि देशमुख यांच्यात बिनसले होते.

  ठोस पुरावे अद्याप मिळाले नसावेत

  त्यातील देशमुख यांच्याबाबतीत असलेल्या मजकूराबाबत न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दखल देत सीबीआयने गुन्हा दाखल केला. मात्र ज्या कलमान्वये हा गुन्हा दाखल केला आहे त्यातून अटक करण्या इतपत ठोस पुरावे सीबीआयला अद्याप मिळाले नसावेत, त्यामुळेच त्यांनी धाडसत्र घालत दहा तासांचा ‘ड्रामा’ केला असावा असे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात सीबीआयने वाझे यांच्या जबाबाचा आधार घेतला असला तरी एनआयएच्या तपासात वाझे खून आणि बनावट चकमकीच्या गंभीर प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे त्याच्या पत्राचा आधार घेवून अन्य काही पोलिस अधिकाऱ्यांची, तसेच मंत्र्यांचीही चौकशी केली जाण्याची, शक्यता या सूत्रांनी वर्तवली आहे.

  मुख्यमंत्र्याची डेलकर मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची घोषणा

  सिंग यांच्या पत्राचा दुसरा सर्वात महत्वाचा भाग दादरा नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या मुंबईतील आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबतचा आहे. मुंबई पोलीसांना तपासात काही महत्वाच्या राजकीय गोष्टी आढळून आल्या आहेत. अनिल देशमुख यांनी डेलकर यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा विधानसभेत केली होती. त्यावरून सिंग आणि देशमुख यांच्यात मतभेद झाले होते असे परमबीरसिंह यांनीच त्यांच्या पत्रात म्हटले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यानी डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी करू असे विधानसभेत सांगितले होते. या मुद्यांवर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा होवून काही निर्णय घेतल्याचे आणि त्याबाबत राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याशी देखील चर्चा करून आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पांडे आता मुंबई पोलीसांच्या मार्फत चौकशी करतील तर परमबीर सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. असे सुत्रांच्या माहितीनिसार समजले.