महाविकास आघाडी समोर पेच; पंढरपूरच्या जागेसाठी राजू शेट्टी आग्रही

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी व कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. त्या बदल्यात शेट्टींना विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन दिले होते. दीड वर्षानंतरही शेट्टींना संधी मिळाली नाही. त्यामुळे पंढरपूरची जागा स्वाभिमानीला देऊन शेट्टींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करता येईल का, या विषयीही राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे. दीड वर्षामध्ये मतदारसंघात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर उमेदवारी कोणाला द्यायची? याविषयी संभ्रम कायम आहे.

    मुंबई : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर होताच सर्वच राजकीय पक्षांमध्ये खलबते सुरू झाली आहेत. महाविकास आघाडीच्या विरोधात भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूरच्या जागेवर उमेदवारीचा दावा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीचा पेच निर्माण झाला आहे.

    राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 17 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

    गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करता, पोटनिवडणुकीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला द्यावी, अशी मागणी पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील स्वाभिमानीच्या नेत्यांनी राजू शेट्टी यांच्याकडे केली आहे. राजू शेट्टी यांनीही पंढरपूरच्या जागेसाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे आग्रह धरू, असे आश्वासन दिले आहे.

    २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी व कॉंग्रेसला पाठिंबा दिला होता. त्या बदल्यात शेट्टींना विधान परिषदेवर संधी देण्याचे आश्वासन दिले होते. दीड वर्षानंतरही शेट्टींना संधी मिळाली नाही. त्यामुळे पंढरपूरची जागा स्वाभिमानीला देऊन शेट्टींना दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करता येईल का, या विषयीही राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरू आहे. दीड वर्षामध्ये मतदारसंघात अनेक राजकीय स्थित्यंतरे घडली आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीसमोर उमेदवारी कोणाला द्यायची? याविषयी संभ्रम कायम आहे.

    या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ किंवा त्यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्याचे संकेत सूत्राने दिले आहेत. दरम्यान राष्ट्रवादीचा उमेदवार ठरल्यानंतरच भाजपा आपल्या पक्षाच्या उमेदवाराची निवड जाहीर करणार आहे. २३ ते ३० मार्चदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवारीची घोषणा केली नाही. त्यातच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पोटनिवडणुकीसाठी जोर लावला आहे. स्वाभिमानीकडून तालुकाध्यक्ष सचिन पाटील, माजी उपसभापती विष्णुपंत बागल, मंगळवेढा येथील अॅड. राहुल घुले यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.