“पवारांचं वर्णन काँग्रेसवर चपखल लागू होतंय”, देवेंद्र फडणवीसांचा खोचक शब्दांत निशाणा

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांनी केलेल्या काँग्रेसच्या वर्णनावरुन काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. पवारांनी केलेलं वर्णन काँग्रेसला चपखल बसतं, असं फडणवीस म्हणाले.

    मुंबई : आजच्या काँग्रेसची अवस्था ही उत्तर प्रदेशातील जमीनदारांसारखी झाली आहे. त्यांच्याकडील जमीन गेल्या आता फक्त हवेली उरली आहे, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीत व्यक्त केलं होतं. मात्र, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांनी केलेल्या काँग्रेसच्या वर्णनावरुन काँग्रेसला जोरदार टोला लगावला आहे. पवारांनी केलेलं वर्णन काँग्रेसला चपखल बसतं, असं फडणवीस म्हणाले.

    फडणवीस नेमकं काय म्हणाले?

    “काँग्रेसचं वर्णन हे शरद पवार यांनी केलेल्या वर्णनापेक्षा वेगळं असूच शकत नाही. कारण काँग्रेस आज जुन्या पुण्याईवर चालली आहे. आमच्या वऱ्हाडात असं म्हणतात की मालगुजारी तर गेली आता उरलेल्या मालावर गुजराण सुरु आहे. तशा प्रकारचंच वर्णन पवारसाहेबहांनी केलं आहे आणि ते काँग्रेसला चपखल लागू पडतं”, असा टोलाही फडणवीसांनी लगावला आहे.

    काय म्हणाले होते शरद पवार?

    शरद पवार म्हणाले, काँग्रेसची नेतेमंडळी आपल्या नेतृत्वाबद्दल वेगळी भूमिका घेण्याच्या मनस्थितीत नसतात. त्याबाबत एक उदाहरण पवारांनी सांगितले. उत्तर प्रदेशतील जमिनदारांकडे मोठी शेती आणि हवेलीही असायची. कमाल जमीन धारणा कायदा झाला आणि त्यांच्या जमिनी गेल्या. पण हवेली आहे, तशीच आहे. पण हवेलीची दुरुस्ती करण्याची ताकद त्या जमीनदारांमध्ये उरली नाही. हजार एकर जमीन आता १५-२० एकरावर आली. जमीनदार उठतो बाहेर जाऊन बघतो. त्याला पीक दिसते. तेव्हा तो हे सर्व हिरव पीक माझे होते, असे सांगतो. पण सध्या ते त्याचे नसते. तशी अवस्था काँग्रेसची झाली आहे, असे निरीक्षण पवारांनी नोंदविले.