pollution

मार्च, एप्रिल व मे महिन्यात शुन्यावर आलेले हवेतील प्रदूषण(air pollution) ऑक्टोबरनंतर कैक पटीने वाढले आहे. या सगळ्या परिस्थितीमुळे मुंबई आणि उपनगरांमधील लोकांच्या श्वसनयंत्रणेवर(breathing issues in mumbai) परिणाम होत आहे.

मुंबई : मार्च, एप्रिल व मे महिन्यात शुन्यावर आलेले हवेतील प्रदूषण(air pollution) ऑक्टोबरनंतर कैक पटीने वाढले आहे. बुधवारी सफर संस्थेकडून वांद्रे कुर्ला संकुल, अंधेरी , बोरिवली व नवी मुंबई ही चार ठिकाणे प्रदूषित नोंदविण्यात आली आहेत. येत्या काही दिवसात यामध्ये वाढ होण्याचे संकेत मिळाले आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे मुंबई आणि उपनगरांमधील लोकांच्या श्वसनयंत्रणेवर परिणाम होत आहे.

मुंबईलगतच्या भागातून म्हणजेच रायगड, पालघर, नवी मुंबई, ठाणे कल्याण डोंबिवली इथून लॉकडाऊन संपल्यानंतर नागरिकांनी रेल्वे (लोकल ) वाहतूक सर्वांसाठी खुली नसल्यामुळे अनेकांनी दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर सुरु केला. यामुळे मुंबई व लगतच्या महामार्गावर भयंकर वाहतूककोंडी झाल्यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ झाली आहे. घरांपासून कामाच्या ठिकाणांचे अंतर वाढलेले असल्यामुळे गरज म्हणून वाहन संख्या वाढत चालली आहे. त्यातल्या त्यात किफायतशीर साधन म्हणून डिझेलच्या वाहनांना मोठी मागणी आहे.

सियामच्या आकडेवारीनुसार गेल्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये पॅसेंजर गाडीच्या विक्रीत १२. ७३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये २,८५,३६७ गाड्यांची विक्री झाली असून गेल्यावर्षी २,५३,१३९ गाड्यांची विक्री झाली होती. याविषयी अधिक माहिती देताना छाती रोग व फुप्फुसरोगतज्ञ डॉ अभय उप्पे म्हणाले की, मुंबईत व लगतच्या शहरांमध्ये अनेक औद्योगिक वसाहती ( एमआयडीसी )असल्यामुळे इथून निर्माण होणारे कोळसा ज्वलन, विविध प्रकारच्या वायू जलनामुळे वायू प्रदूषण होत असते व त्याचसोबत गेल्या तीन महिन्यांमध्ये डिझेल व पेट्रोल गाडीच्या अतिवापरामुळे व डिसेंबर महिन्यात थंडीमुळे आलेले धुके याचा एकत्रित परिणाम आपल्याला दिसून येत आहे.

सध्या मुंबईतील सर्वच रस्ते गाड्यांच्या वर्दळीचे झाले असल्यामुळे गाडीतून निघालेल्या धुरामुळे कार्बन मोनॉक्साइडचे प्रमाण वाढीस लागले आहे. नवी मुंबई, ठाणे रायगड इथे सुरु असलेल्या रस्त्यांच्या कामामुळे धुळीचे साम्राज्य आहे, धुळीमुळे सीओपीडी, आयएलडी व दमा असे श्वसन विकार बळावत आहेत. सीओपीडी हा विकार वयाबरोबर वाढत जातो व फुफुसातील पेशी खराब होतात कारण फुप्फुसाचं काम असतं ऑक्सिजन आत घेणं आण‌ि कार्बन डायऑक्साइड बाहेर टाकणं असते परंतु वायू प्रदूषणामुळे ही प्रक्रिया कुठेतरी बाधित होते. वायू प्रदूषणामध्ये सल्फरची पातळी वाढली की फुफ्फुसाचे आजार बळावत असल्याचेही या प्रदूषणयुक्त भागात दिसून आले आहे. डोळ्यांची जळजळ होणे, त्वचेला खाज सुटणे, डोळ्यातून पाणी येण्यासारखा त्रास होतो. धुळीचे लोट वाऱ्यासोबत वाहत राहिले वा कोंडीमुळे प्रदूषित धूर, धूळ उडत राहिली तर श्वास घेण्याच्या क्षमतेसह शरीरातील ऑक्सिजनची पातळीही कमी होते. त्यामुळे सतत झोप येणे, उदास वाटणे या मानसिक तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आण‌ि अंधेरी- बोरीवली ही महत्त्वाची वाहतूककोंडीची जंक्शन समजली जातात. मुंबई- नवी मुंबई शहराला समुद्रकिनारा लाभल्यामुळे ही शहरे इतकी प्रदूषित होण्याचं कारण नाही. कारण दिवसा समुद्रावरून जमिनीकडे वारे वाहतात आण‌ि रात्री जमिनीवरुन समुद्राकडे वारे वाहतात. त्यामुळे प्रदूषणकारी घटक शहरात साचून राहत नाहीत. हिवाळ्यात कमी झालेल्या तापमानामुळे व वाढलेल्या वाहनांतून निघत असलेल्या धुरामुळे  हवेची घनता वाढली असल्यामुळे हवेतील प्रदूषणकारी घटकांची हालचाल होत नाही व हे घटक धुळ, धूर व धुरक्यामध्ये मिसळत असल्यामुळे याचा त्रास नागरिकांना होत आहे अशी माहिती डॉ अभय उप्पे यांनी दिली.

कोरोना महामारीमुळे राज्य सरकारने बाहेर फिरताना मास्क लावणे बंधनकारक केले असल्यामुळे या मास्कमुळे तुम्ही वायू प्रदूषणापासूनही स्वतःला वाचवू शकता त्यामुळे थंडीचा मोसम असेपर्यंत व कोरोना महामारी संपेपर्यंत मास्क वापरण्याचे आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे.