जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे – अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन

मुंबई: राज्यात यापुढे आठ ते दहा दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले

 मुंबई:  राज्यात यापुढे आठ ते दहा दिवस पुरेल एवढा रक्तसाठा उपलब्ध असून जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन, अन्न व औषध प्रशासनमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे.कोविड-१९ या विषाणूच्या झालेल्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्त पुरवठा, पिपीई किट, मास्क याची उपलब्धता जाणून घेण्यासाठी ब्लड बॅंक चालक,  मास्क आणि पिपीई  किट उत्पादक यांच्या सोबत चर्चा करण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते बोलत होते.

 या बैठकीला अन्न व औषध प्रशासन आयुक्त अरुण उन्हाळे, हाफकिन संस्थेचे कार्यकारी संचालक राजेश देशमुख यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोना झालेल्या व्यक्तीला उपचाराचा भाग म्हणुन रक्ताची आवश्यकता नसली तरी अशा व्यक्तीला जर ॲनेमिया किंवा इतर आजार असतील अशा परिस्थितीत त्याला रक्ताची आवश्यकता भासू शकते. याशिवाय इतर शस्त्रक्रीया, बाळंतपण आणि थॅलेसेमिया, सारख्या आजारपणासाठी रक्ताची आवश्यकता असते. राज्यातील सर्व ब्लड बॅंक यांचा व्हॉट्‍सॲप गृप तयार करुन वेळोवेळी याची माहिती घेतली जाते. आपल्या जवळच्या ब्लड बॅंकेत, रुग्णालयात किंवा आपल्या सोसायटीमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करून रक्तदान करावे असेही  आवाहन डॉ. शिंगणे यांनी केले आहे. सध्या राज्यात उपलब्ध असलेला रक्तसाठा लक्षात घेता रक्तदात्याची संपूर्ण सुरक्षीतता राखून छोटे छोटे कॅम्प घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

प्लाज्मा थेरपीच्या परवानगीसाठी औषध प्रशासनाचा पुढाकार कोरोनाच्या उपचारासाठी  प्लाज्मा थेरपीच्या परवानगीसाठी  केंद्राकडून लागणाऱ्या सर्व परवानग्या तातडीने मिळवून देण्यात औषध प्रशासन विभागाने पुढाकार घेऊन सर्व परवानगी केवळ दोन दिवसात मिळवून देण्यात आल्या आहेत. खासगी डॉक्टरांनी रुग्ण तपासण्यासाठी आपले  दवाखाने सुरु करावेत. असे डॉ. शिंगणे यांनी  आवाहन केले आहे. खाजगी डॉक्टरांसाठी पीपीई किट आणि एन ९५ मास्क याचा आवश्यक पुरवठा करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दोन वितरक नेमण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून काही केमिस्टच्या दुकानांमधून पिपीई किट आणि एन ९५ मास्क विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहेत.  यामुळे खासगी डॉक्टरांना रुग्ण तपासणीसाठी पीपीई कीट आणि एन ९५ मास्क उपलब्ध होणार आहेत. कोरोना या आजाराव्यतिरिक्त इतर रुग्ण तपासण्यासाठी खासगी दवाखाने सुरू ठेवून रूग्ण सेवा करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.