मुंबईत सहा महिन्यांत दगावलेल्या कोरोना रुग्णांमध्ये एकही लस न घेतलेल्यांचे प्रमाण जास्त – सर्वेक्षणातून मोठा खुलासा

एका सर्वेक्षणातून(Survey) बाब पुढे आली आहे की, मुंबईमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये कोरोनाने मृत्यू (Corona Deaths In Last 6 Months)झालेल्यांमध्ये एकही लस न घेतलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. मागील सहा महिन्यात एकही लस न घेणारे ५७६जण दगावले आहेत.

    मुंबई : सध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा(Corona Second Wave) कहर ओसरु लागला आहे. मात्र त्याच वेळी तिसऱ्या लाटेचा धोका नजीक येत असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. कोरोनाचा प्रतिबंध रोखण्यासाठी देशात लसीकरण मोहीम(Vaccination Drive) सुरु करण्यात आली आहे. नागरिकांना लस घेण्याचे वारंवार आवाहन केले जात आहे. त्या शिवाय लसींचा तुटवडा असल्याचे देखील जाणवत असल्याने त्या मिळण्यात अडचणी येत आहेत. अशातच एका सर्वेक्षणातून(Survey) ही बाब पुढे आली आहे की, मुंबईमध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये कोरोनाने मृत्यू(Corona Patients Death In Mumbai) झालेल्यांमध्ये एकही लस न घेतलेल्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. मागील सहा महिन्यात एकही लस न घेणारे ५७६जण दगावले आहेत.

    ९३.०५ टक्के नागरीकांना एकही लस नाही
    आरोग्य विभागातील सूत्रांच्या माहितीनुसरा गेल्या सहा महिन्यांमध्ये एकही लस न घेतलेल्या दोन तृतीयांश रुग्णांना अतिदक्षता विभागात भरती करण्याची वेळ आली. यापैकी ९३ टक्के रुग्ण (५७६) रूग्णांचा मृत्यू झाला आहे. लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या व्यक्तींच्या मृत्यूच्या प्रमाणाबाबत केलेल्या अभ्यासात ही बाब उघड झाली. या सर्वेक्षणानुसार एकही लस न घेतलेल्या व्यक्तींचे सध्याचे प्रमाण लोकसंख्येच्या ९३.०५ टक्के आहे. तर केवळ ५.९७ टक्के नागरीकांनाच लसीचा एक डोस मिळाला आहे. तर दोन्ही डोस घेतलेल्यांचे प्रमाण ०.९६ टक्के आहे. लसीकरण आणि त्या अभावाने मृत्यू होण्याचे प्रमाण या संदर्भात अभ्यास करण्यासाठी हे सर्वेक्षण घेण्यात आले.

    लसवंताच्या केवळ ०.४ टक्के मृत्यूची नोंद
    लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण शक्य असली तरी त्याने मृत्यू होण्याचा दर खूप कमी नोंदवला गेला आहे. या अभ्यासात समाविष्ट लस घेतलेल्या ७१जणांना कोव्हॅक्सिन तर ६०४ जणांना कोविशिल्ड लस घेतल्याची माहिती देण्यात आली. तर  २ जणांनी चीनची सिनोफार्म लस घेतल्याची नोंद आहे.मात्र त्यापैकी केवळ ३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. लस घेतलेल्यापैकी ९.८ टक्के रुग्णांना कोरोना झाल्याने रूग्णालयात भर्ती करावे लागले तर केवळ ०.४ टक्के जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यामुळे या अभ्यासातून स्पष्ट झाले की कोरोनाची लस घेणे सुरक्षित आहे. लस घेतल्याने रूग्णालयात दाखल होण्याचा आणि मृत्यूचा धोकाही कमी झाल्याचे निरिक्षणात दिसून आल्याचे आरोग्य अधिका-यांचे मत आहे.