sandip deshpande

    मुंबई : मुंबई शहर व उपनगरांत मुसळधार पावसाने मागील दोन दिवसांपासून अक्षरश: थैमान घातले आहे.अशातच शनिवारच्या मध्यरात्री मुंबईकरांवर काळाने घाला घातला. भीषण रूप धारण केलेल्या पावसात शनिवारी मध्यरात्री ते रविवारी सकाळपर्यंत संरक्षक भिंत कोसळून, दरड पडून तसेच घरांची पडझड अशा पाच दुर्घटनांमध्ये २८ मुंबईकरांना हकनाक जीव गमवावा लागला, तर ८ जण जखमी झाले आहेत. लहान मुले, महिला, वृद्ध ढिगाऱ्याखाली दबले गेले होते. मदत करणाऱ्यांचेही काळीज पिळवटून निघत होते. मध्यरात्री गाढ झोपेत मुंबईकरांवर काळाने झडप घातली. या दुर्घटनेनंतर मनसेने ठाकरे सरकारवर तसेच मुंबई महानगरपालिकेवर जोरदार निशाणा साधला आहे.

     

    काय म्हणाले संदीप देशपांडे?
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुंबई महानगरपालिकेवर हल्लाबोल केला आहे. तसेच “मुंबईकरांची एवढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण…” असा सणसणीत टोला देखील त्यांनी लगावला आहे. संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “जसा बेस्ट “शी.एम” चा सर्वे केला तसा बेस्ट महापालिकेचा सर्वे केला तर त्याच्यात सुद्धा मुंबई महापालिका पहिली येईल. मुंबईकरांची एवढी वाट लावून ही महापालिका पहिली कशी हा लोकांना प्रश्न पडेल पण सामनामध्ये हेडलाईन येईल “आमचीच लाल आमचीच लाल”” असं देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

    दरम्यान , हवामानात झालेल्या उल्लेखनीय बदलामुळे मुंबईसह संपूर्ण कोकणात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा धिंगाणा सुरू असून, येत्या ४८ तासांत मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.