३१ आठवड्यांच्या अल्पवयीन मुलीची गर्भपातासाठी याचिका; जे. जे रुग्णालयाच्या अधिष्ठतांना विशेष वैद्यकीय विभागातंर्गत चाचणी करण्याचे निर्देश

मुंबईतील गोवंडी येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने काही महिन्यापूर्वी लैंगिक अत्याचार केले. तसेच तिने घरी न सांगण्याची धमकीही तिला दिली. मात्र, काही महिन्यांनी तिचे पोट वाढू लागले. सुरुवातीला तिला गॅस झाला असेल म्हणून पीडितेच्या पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

    मुंबई : लैंगिक अत्याचारामुळे ३१ आठवड्यांची गर्भवती राहिलेल्या एका अल्पवयीन मुलीने गर्भपातासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सदर याचिकेची गंभीर दखल घेत न्यायालयाने जे. जे रुग्णालयाच्या अधिष्ठातांना विशेष वैद्यकीय विभाग गठीत करून पिडितेची तातडीने वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

    मुंबईतील गोवंडी येथील झोपडपट्टीत राहणाऱ्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने काही महिन्यापूर्वी लैंगिक अत्याचार केले. तसेच तिने घरी न सांगण्याची धमकीही तिला दिली. मात्र, काही महिन्यांनी तिचे पोट वाढू लागले. सुरुवातीला तिला गॅस झाला असेल म्हणून पीडितेच्या पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, तिला रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर ती ३० आठवड्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.

    त्याबाबत पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे रितसर तक्रार दाखल केली असून मुलगी अल्पवयीन असल्याने तिला मानखुर्द येथील बाल कल्याण समितीकडे सोपविण्यात आले आहे. नियमानुसार २० आठवड्यानंतर गर्भपात करण्यासाठी न्यायालयाची परवानगी आवश्यक आहे. म्हणून तिच्या वडिलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवारी न्या. ए. ए. सय्यद आणि न्या. माधव जामदार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.

    पीडिता ही अल्पवयीन असून इयत्ता सातवीत शिकत आहे. तिला गरोदरपणाचे परिणाम समजत नसून त्याचे परिणाम तिच्या स्वतःवर आणि गर्भातील बाळावर होऊ शकतात. बाळाला जन्म दिल्यास आपल्या मुलीला मानसिक आणि शारीरिक इजा पोहोचू शकते. त्यामुळे गर्भपाताची परवानगी द्यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली.

    याची गंभीर दखल घेत जे. जे. रुग्णालयाला वैद्यकीय मंडळ गठीत करून तातडीने पिडितेची तपासणी करण्याचे निर्देश दिले तसेच तिचा अहवाल १५ मार्चपर्यंत सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी तहकूब केली.