फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका; पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वत: खुलासा केला पाहिजे: खासदार संजय राऊत

परदेशी कंपन्या आणि अॅपने देशात राजकारणी, पत्रकार आणि संपादक अशा पंधराशेहून अधिक फोन टॅप झाल्याची बाब उघड झाली आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. फोन टॅपिंग झाल्याची काही नावे समोर आली आहेत.

    मुंबई : काही परदेशी कंपन्या आणि अॅपकडून काही पत्रकार आणि राजकारण्यांचे फोन टॅप झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.  फोन टॅपिंग हा देशाच्या स्वातंत्र्याला धोका असून पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी स्वत: त्यावर खुलासा केला पाहिजे, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. या मुद्द्यावर संसदेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

    पत्रकार, राजकारणी भीतीच्या सावटाखाली
    परदेशी कंपन्या आणि अॅपने देशात राजकारणी, पत्रकार आणि संपादक अशा पंधराशेहून अधिक फोन टॅप झाल्याची बाब उघड झाली आहे. त्यावर खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. फोन टॅपिंग झाल्याची काही नावे समोर आली आहेत. अजूनही बरीच नावे समोर यायची आहेत. त्यात पत्रकारांचे, संपादकांचेही फोन टॅप झाले. हे गंभीर आहे. गेल्या काही वर्षापासून पत्रकार, राजकारणी या देशात भीतीच्या सावटाखाली वावरत आहेत. आपल्यावर पाळत ठेवली जाते, आपले फोन टॅप केले जातात. ही सगळ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे.

    पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी खुलासा करणे गरजेचे
    त्यावर पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्र्यांनी समोर येऊन खुलासा करणे गरजेचे आहे. अशा प्रकारे या देशाच्या प्रमुख लोकांचे फोन ऐकले जात असतील तर या देशाच्या स्वातंत्र्याला मोठा धोका आहे, असे राऊत म्हणाले. ते म्हणाले की देशात शासन आणि प्रशासन कमजोर आणि दुबळे असल्याचे हे लक्षण आहे. कोणीही ऐरागैरा येतो आणि आमचे फोन टॅप करतो. आमच्याकडे सायबर क्राईम संदर्भात कठोर नियम नाही, कायदे नाहीत.

    प्रश्न संसदेत लावून धरणार
    सरकारकडून ज्या पद्धतीने स्वत:हून या सर्व गोष्टींचा मुकाबला करायला हवा ते दिसत नाही. त्यामुळे देशात सर्वच क्षेत्रात भीतीचे वातावरण आहे, अशी टीका त्यांनी केली. याबाबत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी माझे बोलणे झाले आहे. आम्ही हा प्रश्न संसदेत लावून धरणार आहोत, अशी माहितीही त्यांनी दिली. खासदार राऊत म्हणाले की, राज्यात सरकार बनताना फोन टॅपिंग करण्यात आली होती. त्याची चौकशी सुरू आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हे प्रकरण विधानसभेत मांडले.