फोन टॅपिंग सरकारच्या मंजुरीनेच,आता बळीचा बकरा केलं जातंय, IPS रश्मी शुक्ला यांचा न्यायालयात गौप्यस्फोट

‘फोन टॅपिंग’साठी शुक्ला यांनी तत्कालिन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची परवानगी घेतली होती. याबाबत सादर केलेल्या अहवालाची कुंटे यांनी दखल घेतली होती. तसेच त्यांनी शासनाला दिलेल्या अहवालात परवानगीविषयी नमूद केले होते. नंतर मात्र त्यांनी या प्रकरणी दिशाभूल केली, असा दावा शुक्ला यांच्यातर्फे करण्यात आला.

    आपण केलेले फोन टॅपिंग हे राज्य सरकारच्या परवानगीनेच केले होते असा खळबळजनक दावा राज्य गुप्त वार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रश्मी शुक्ला यांनी न्यायालयात केला आहे. शुक्ला यांच्या या दाव्यामुळे या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रश्मी शुक्ला सध्या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत.

    रश्मी शुक्ला यांच्यावतीने ज्येष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी हायकोर्टात बाजू मांडली. “रश्मी शुक्ला या गुप्तचर विभागाच्या प्रमुख होत्या, त्यावेळी महाराष्ट्र पोलीस महासंचलाकांनी काही फोन नंबर देखरेखीखाली ठेवण्याचे निर्देश दिले होते. हे नंबर काही राजकारण्यांच्या संपर्कातील होते, जे भ्रष्टाचार करत होते. आवडतं पोस्टिंग आणि ट्रान्सफरसाठी ते लाच मागत होते. त्यामुळेच काही फोन नंबर निगराणीखाली ठेवले होते”, असा युक्तीवाद महेश जेठमलानी यांनी केला.

    ‘फोन टॅपिंग’साठी शुक्ला यांनी तत्कालिन अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची परवानगी घेतली होती. याबाबत सादर केलेल्या अहवालाची कुंटे यांनी दखल घेतली होती. तसेच त्यांनी शासनाला दिलेल्या अहवालात परवानगीविषयी नमूद केले होते. नंतर मात्र त्यांनी या प्रकरणी दिशाभूल केली, असा दावा शुक्ला यांच्यातर्फे करण्यात आला.

    नेमकं काय आहे प्रकरण?

    डॉ. रश्मी शुक्ला यांनी गेल्या वर्षीकाही फोन टॅपिंग केले होते. त्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. त्यानंतर हा राजकीय मुद्दा बनला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधला होता. या माहितीच्या आधारे राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला होता.