प्लाझ्मा थेरपी केलेल्या पहिल्या रुग्णाचा मुंबईत मृत्यू, पालिकेच्या प्लाझ्मा उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह

मुंबई: वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर केलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याचे खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल जाहीर केले असताना आज संबंधित ५३ वर्षीय

 मुंबई: वांद्रे येथील लिलावती रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर केलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याचे खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल जाहीर केले असताना आज संबंधित ५३ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे.  यामुळे पालिकेच्या प्लाझ्मा उपचार पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पालिका या उपचार पद्धतीबाबत पुनर्विचार करणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

लिलावती रुग्णालयात संबंधित ५२ वर्षीय रुग्णाला सर्दी, ताप आणि फुप्फुसाचा संसर्ग होऊ लागल्याने २० एप्रिल रोजी उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यानंतर या रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे त्याच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्याचा निर्णय लीलावती रुग्णालय प्रशासनाने घेतला होता. याबाबत त्यांनी पालिका प्रशासनाकडून परवानगी मागितल्यानंतर शनिवारी नायर रुग्णायातून कोरोनामुक्त झालेल्या ‘दाता’ रुग्णाच्या रक्तातून अँटिबॉडिज मिळवून प्लाझ्मा तंत्रज्ञानाने उपचार करण्यात आले होते. मात्र त्या रुग्णाचा आज मृत्यू झाला. लिलावती रुग्णालय प्रशासनाच्या मागणीनंतरच संबंधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यास परवानगी देण्यात आली होती. यानुसार शनिवारी प्लाझ्मा थेरपी करण्यातही आली. या थेरपीनंतर संबंधित रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती लीलावती प्रशासनाकडून पालिकेला देण्यात आली होती. मात्र आज त्या रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या पार्श्वभूमीवर पालिकेचे तज्ज्ञ  डॉक्टर लीलावती रुग्णालयाशी चर्चा करीत आहेत. त्यांच्याकडून मृत्यूच्या कारणांबाबत अहवाल मागवण्यात आला असल्याची माहिती पालिकेच्या उप कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. दक्षा शहा यांनी दिली.

अशी आहे प्लाझ्मा थेरपी  

चीनसह काही परदेशांमध्ये प्लाझ्मा तंत्रज्ञान यशस्वी झाले आहे. चीनमध्ये तब्बल १२ कोरोनाबाधित रुग्णांची प्लाझ्मा थेरपीनंतर कोरोनाटेस्ट निगेटिव्ह आली आहे. यानुसार मुंबई महानगरपालिकेने राज्य सरकारच्या परवानगीनंतर कोरोना आजारातून पूर्ण बरा झाल्यानंतर इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकलच्या गाइडलाइननुसार ठराविक दिवस पूर्ण झाल्यानंतर कोरोनामुक्त रुग्णाच्या शरीरातून अँटीबॉडिज मिळवून प्लाझमा थेरपी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नायर रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी केंद्रही सुरू करण्यात आले आहे.