नायर रुग्णालयामध्ये प्लाझ्मा थेरपीने ४ जण कोरोनामुक्त – सायन, केईएममध्येही सुरु करणार प्लाझ्मा थेरपी

मुंबई:नायर रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे दोन रुग्ण प्लाझ्मा थेरपीने बरे झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार, प्लाझा थेरेपीने बरे होणाऱ्यांची संख्या एकूण चार झाली

 मुंबई: नायर रुग्णालयात कोरोनावर उपचार घेणारे दोन रुग्ण प्लाझ्मा थेरपीने बरे झाले असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार, प्लाझा थेरेपीने बरे होणाऱ्यांची संख्या एकूण चार झाली आहे. लवकरच ही प्लाझ्मा थेरपी नायर नंतर केईएम आणि सायन रुग्णालयात सुरु होणार असल्याचे मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी स्पष्ट केले होते. त्याला आता पालिका रुग्णालयांचे प्रमुख आणि संचालक डॉ. रमेश भारमल यांनी दुजोरा दिला आहे. 

ही थेरपी सायन आणि केईएम या पालिकेच्या प्रमुख रुग्णालयात सुरु व्हावी यासाठी आयसीएमआर म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चला पत्रव्यवहार करण्यात आला आहे. तिथुन परवानगी मिळाल्यानंतर लवकरच ही थेरपी सायन आणि केईएममध्ये सुरु करण्यात येणार आहे.नायर रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी केंद्र सुरु करण्यात आले आहे. त्यामूळे आतापर्यंत ४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर ही उपचार पद्धती आणखी फायदेशीर ठरावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे.कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीच्या शरीरातून अँटीबॉडिज मिळवून तिचा वापर कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी करण्यात येतो. या उपचार पद्धतीसाठी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाच्या शरीरातील रक्तातून प्रतिपिंडे मिळवणे आवश्यक आहे. यासाठी पालिकेला डोनर मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यासाठी ५० ते ६० जणांकडून विचारणा करण्यात आली आहे. प्लाझ्मा थेरेपी साठी कोरोनामुक्त झालेला रुग्ण प्रकृतीने ठिक असावा. त्याला कोणतेही आजार नसावेत. वय ६० वर्षांपेक्षा जास्त नसावे, वजन ५० किलोपेक्षा जास्त नसावे. प्लाझ्मा थेरपी करण्यात येणाऱ्या रुग्णाशी दात्याचा रक्तगट मॅच होणे ही गरजेचे आहे. 

सायन आणि केईएम रुग्णालयात लवकरच प्लाझ्मा थेरपी सुरु केली जाणार आहे.त्यासाठी आयसीएमआरची परवानगी आवश्यक आहे. एफडीएची ही परवानगी घेतली आहे. आपली टीम देखील तयार आहे. त्यानंतर लगेच थेरपी सुरु करण्यात येणार आहे. डॉ. रमेश भारमल , संचालक, पालिका प्रमुख रुग्णालये