rakesh wadhwan

पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला एचडीआयएलचा प्रमोटर राकेश वाधवानवर पेसमेकर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुंबईतील सरकारी जे.जे रुग्णलायात येऊ शकते, अशी माहिती गुरुवारी कारागृह प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली.

    मुंबई : पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेला एचडीआयएलचा प्रमोटर राकेश वाधवानवर पेसमेकर प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया मुंबईतील सरकारी जे.जे रुग्णलायात येऊ शकते, अशी माहिती गुरुवारी कारागृह प्रशासनाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली.

    पंजाब अँण्ड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या ४३५५ कोटीच्या घोटाळ्याप्रकरणी एचडीआयएलचे व्यवस्थापकीय संचालक सारंग वाधवान आणि कंपनीचे प्रमोटर राकेश वाधवान, दलजीत सिंग पाल, गुरुंनाम सिंग होठी यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेत असलेल्या राकेश वाधवानाची तब्येत खालावल्याने पालिकेच्या के.ई.एम रुग्णालयात एप्रिल महिन्यात दाखल करण्यात आले आहे.

    वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन देण्यात यावा, अथवा खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी द्यावी, अशी मागणी करणारी याचिका वाधवानने उच्च न्यायालयात केली आहे. मागील सुनावणीदरम्यान, शस्त्रक्रिया करण्यासाठी शासकीय रुग्णालयातील सुविधा आणि उपलब्धतेबाबत माहिती देण्यात यावी, सुविधा नसल्यास वाधवान स्वतःच्या खर्चाने शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयाची निवड करू शकतात, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले होते.

    त्यावर न्या. भारती डांगरेंसमोर सुनावणी पार पडली. तेव्हा, जे.जे रुग्णालयात ड्युअल चेंबर पेसमेकर इम्प्लांटेशनची सुविधा उपलब्ध असून त्यासोबतच पोस्ट-ऑप आयसीसीयू मॉनिटरिंग सुविधा असल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने न्यायालयाला देण्यात आली. त्यावर उत्तर सादर करण्यासाठी वाधवनाच्यावतीने अवधी मागण्यात आला. तो मान्य करत न्यायालयाने सुनावणी ११ ऑक्टोबर रोजी निश्चित केली.