delivery of a baby

मुंबईतल्या(Mumbai) गोल देऊळ येथील स्पॉटवर पोलीस नाईक चित्रांगद बना हे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी बेलासिका डंकन रोडवरील एक दुकानासमोर महिलेची प्रसूती(Delivery On Road) झाल्याचे पादचाऱ्याने त्यांना सांगितले. ही माहिती समजताच बना यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले.

    संतोष बिचकुले, मुंबईः भररस्त्यात प्रसूती(Delivery On Road) झालेल्या महिलेला वेळेवर पोलिसांनी जे. जे. रुग्णालयात(J. J. Hospital) नेल्याने आई आणि बाळ दोघांचेही प्राण वाचले. ही कौतुकास्पद कारवाई काळबादेवी वाहतूक शाखेत कर्तव्यावर असलेल्या पोलीस नाईक चित्रांगद बना यांनी केली. महिला व तिच्या बाळासाठी देवदूत ठरलेल्या बना यांचे वरिष्ठ पोलिसांसह डॉक्टरांनी कौतुक केले.

    मुंबईतल्या गोल देऊळ येथील स्पॉटवर पोलीस नाईक चित्रांगद बना हे कर्तव्य बजावत होते. त्यावेळी बेलासिका डंकन रोडवरील एक दुकानासमोर महिलेची प्रसूती झाल्याचे पादचाऱ्याने त्यांना सांगितले. ही माहिती समजताच बना यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. दुकानाच्या शेजारी असलेल्या इमारतीतल्या रहिवाशांकडून साडी मागवून त्या महिलेभोवती कुंपण केले व १०० नंबरवर फोन करून घडलेला प्रसंग त्यांनी सांगितला. दरम्यान, एका वयोवृद्ध महिलेने बाळाची नाळ कापली. पोलीस मुख्यालयातून बिनतारी संदेश प्राप्त होताच व्ही. पी. रोड पोलीस ठाण्याची मोबाईल व्हॅन क्रमांक १ घटनास्थळी दाखल झाली. महिला व बाळाला पोलीस गाडीतून तात्काळ जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    चित्रांगद बना यांचे कौतुक
    प्रसूती झालेल्या मोहिनी सोळंकी (२५) ही दादर परिसरात राहते.भररस्त्यात तिने मुलाला जन्म दिला. त्यावेळी चित्रांगद बना यांनी प्रसंगावधान राखत महिलेला व तिच्या बाळाला वेळेवर रुग्णालयात नेल्याने आजच्या घडीला दोघेही सुखरूप असून सध्या जे जे रुग्णालयातील वॉर्ड नंबर २९ मध्ये दाखल आहेत. या उत्तम कामगिरीबद्दल काळबादेवी वाहतूक चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिकराव साळुंखे यांनी चित्रांगद बना यांचे कौतुक केले.