‘कोविड’ च्‍या अनुषंगाने प्रतिबंधात्‍मक काळजी घेत पोलि‍ओ लसीकरण मोहीम यशस्‍वी

उर्वरितांनी २५ सप्‍टेंबरपर्यंत लसीकरण करुन घेण्‍याचे महापालिकेचे आवाहन 

मुंबई: बृहन्‍मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ‘कोविड – १९’ या संसर्गजन्‍य आजाराच्‍या अनुषंगाने नियंत्रण व औषधोपचार कार्यवाही सुरु असताना आरोग्‍यविषयक इतर मोहिमादेखील यथायोग्‍यप्रकारे राबविण्‍यात येत आहेत. याच अंतर्गत ‘कोविड’ बाबत आवश्‍यक ती सर्व प्रतिबंधात्‍मक काळजी घेत दिनांक २० सप्टेंबर २०२० रोजी बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रात पल्स पोलिओ मोहीम यशस्‍वीपणे राबविण्‍यात आली. या मोहिमेंतर्गत बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सर्वत्र ४ हजार ७९७ ‘बुथ’चे आयोजन करण्यात आले होते. ज्‍यासाठी १३ हजार ९९२ व्‍यक्‍ती कार्यरत होत्‍या. यामध्‍ये महापालिका कर्मचारी, आरोग्य स्वयंसेविका, आंगणवाडी सेविका / मदतनीस, शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्ते यांचा समावेश होता. ही मोहीम कोविडच्‍या पार्श्‍वभूमीवर होत असल्‍याने मोहिमेत सहभागी होणा-या सर्वांना बालकांना स्‍पर्श न करता लस पाजण्‍याचे प्रशिक्षण देण्‍यात आले होते. त्‍याचबरोबर सुयोग्‍यप्रकारे मास्‍क वापरणे, सॅनिटायझरचा योग्‍य वापर करणे आणि बुथवर एकावेळी कमीत-कमी व्‍यक्‍ती शारीरिक दूरीकरण पाळण्‍यासह उपस्थित असतील या बाबींचीही काळजीपूर्वक अंमलबजावणी करण्‍यात आली. या एक दिवसीय मोहिमेत एकूण ५ लाख १२ हजार ८६० बालकांना पोलिओ लसीची मात्रा देण्यात आली. तसेच ज्‍या बालकांनी २० सप्‍टेंबर २०२० रोजी पल्‍स पोलि‍ओ लसीचा लाभ घेतला नसेल; त्या बालकांना / लाभार्थ्यांना दुस-या टप्प्यात सलग पाच दिवस घरोघरी जावून पोलिओ लसीची मात्रा देण्यात येणार आहे. यानुसार येत्‍या शुक्रवारपर्यंत २५ सप्‍टेंबर २०२० पर्यंत पोलिओची लस देण्‍यात येत आहे, अशी माहिती महापालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे देण्‍यात आली आहे.

भारत सरकारच्या आदेशान्वये पोलिओ निर्मुलनासाठी ‘राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम’ सन १९९५ पासून दरवर्षी राबविण्यात येत आहे. यामध्ये पाच वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओ लसीची अतिरि‍क्त मात्रा देण्यात येते. गेली २५ वर्षे केलेल्या अथक परि‍श्रमांमुळे भारतामध्ये १३ फेब्रुवारी २०११ नंतर आजतायगत एकही पोलिओ रुग्ण आढळून आला नाही. यामुळे भारताला मार्च २०१४ मध्ये ‘पोलिओमुक्त भारत’ असे प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे.

वरीलनुसार दरवर्षी राबविण्‍यात येणा-या पोलिओ लसीकरण मोहिमेची दोन टप्प्यात विभागणी केली जाते. पहिल्‍या टप्प्यात मोहिमेच्या प्रथम दिवशी म्‍हणजेच एका रविवारी बुथद्वारे ०-५ वयोगटातील बालकांना पोलिओ लसीची मात्रा दिली जाते. तर दुस-या टप्प्यात सलग पाच दिवस घरोघरी जावून उर्वरि‍त बालकांना पोलिओ लसीची मात्रा देण्यात येते.

भारत सरकारच्या आदेशान्‍वये पल्स पोलिओ कार्यक्रम २० सप्टेंबर २०२० रोजी आयोजित करण्यासंदर्भात आदेश प्राप्त झाले होते. मात्र, कोविड – १९ विषयक आपत्‍कालीन परि‍स्थितीत जनमानसांत असलेल्या कोविड-१९ या आजाराच्या भयामुळे तसेच उपलब्ध मनुष्यबळ कोविड-१९ या आजाराच्या उपाययोजना व रुग्ण व्यवस्थापन यामध्ये व्यस्त असल्यामुळे सदर मोहीम राबविणे आव्हानात्मक होते. तथापि, बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे करण्‍यात आलेल्‍या सुव्‍यवस्थित नियोजनामुळे मोहिमेचा पहिला टप्‍पा यशस्‍वीपणे राबविण्‍यात आला आहे.

सध्‍या मोहिमेचा दुसरा टप्‍पा हा २५ सप्‍टेंबर २०२० पर्यंत राबविण्‍यात येत असून, या अनुषंगाने नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की, ज्या बालकांना रविवार २० सप्‍टेंबर रोजी पोलिओ लसीची मात्रा मिळाली नसेल, त्यांनी मोहिमेच्‍या दुस-या टप्‍प्‍यात पोलिओ लसीची मात्रा मिळेल, याची खात्री करुन घ्यावी, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या सार्वजनिक आरोग्‍य खात्‍याद्वारे करण्‍यात आलेले आहे
.