शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्या ‘सिल्व्हर ओक’वरील भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण

ममता बॅनर्जी यांच्या विजयात मोलाचा वाटा असणारे प्रशांत किशोर शरद पवारांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांचा चेहरा कोण असणार यासंबंधी सध्या विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे.

  पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय रणनीतीकार म्हणून यापुढे काम न करण्याची घोषणा करणारे प्रशांत किशोर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही भेट सुरु आहे.

  ममता बॅनर्जी यांच्या विजयात मोलाचा वाटा असणारे प्रशांत किशोर शरद पवारांची भेट घेत असल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. २०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर विरोधकांचा चेहरा कोण असणार यासंबंधी सध्या विरोधी पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे.

  लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची भाजपाविरोधात मोर्चेबांधणी सुरु असून यादरम्यान प्रशांत किशोर आणि शरद पवारांमध्ये होणारी ही भेट महत्वाची मानली जात आहे. पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीत ममता बँनर्जी यांना यशस्वी करण्यात मोलाची कामगिरी करणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्यात बंद दाराआड चर्चा झाली आहे. त्यामुळे येत्या काळात देशात बंगाल मॉडेल आणि मविआ फॉर्म्युला वापरून भाजप विरोधातील सर्व पक्षांची मोट बांधण्यासाठी शरद पवार सक्रीय झाल्याचे सांगण्यात येत आहे.

  सदिच्छा भेट असल्याची माहिती

  प्रशांत किशोर यांनी अचानक शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी त्यांना भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले. तरीही राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी सुमारे दोन तासाहून अधिकवेळ बंद दाराआड चर्चा केली. ही चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याने या बैठकीत मोठा निर्णय होण्याचे कयास लढवले जात आहेत.

  भाजप समोर समर्थ पर्यायांची चाचपणी

  दरम्यान, प्रशांत किशोर यांना पवारांच्या निवासस्थानी  लंच करीता आमंत्रण होते. या भेटीमध्ये प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यात सध्याची राजकीय स्थिती, आगामी राजकीय रणनिती, निवडणुकांचीच तयारी असल्याचे निश्चितपणे मानले जात आहे. प्रशांत किशोर यानी मोदींसोबत काम केले होते. नंतर त्यांनी पंजाब, बिहार, बंगलामध्येही स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम केले आहे.

  या पार्श्वभूमीवर ते आता शरद पवारांना देशातील आणि प्रत्येक राज्यातील राजकीय स्थितीबाबत मोलाचा सल्ला देवू शकतात. देशात कॉंग्रेसची शक्ती क्षीण होत असताना भाजप समोर समर्थ राजकीय पर्याय देण्याबाबत कोणत्या शक्यता असू  शकतात याचाही या लंच डिप्लोमसीमध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.

  राज्यातील मविआ मॉडेल देशात

  कोरोना संकटामुळे बदललेल्या राजकीय परिस्थिती आणि नागरिकांची मानसिकता याविषयीही चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या बैठकीत राज्यात आणि महाराष्ट्रात बंगाल मॉडल लागू करता येऊ शकते का? तसेच राज्यातील मविआ मॉडेल देशात किंवा राज्या राज्यांमध्ये लागू होऊ शकते का? कोणत्या राज्यांमध्ये अशा प्रकारचे मॉडल लागू होऊ शकते? त्यासाठी विरोधी विचारधारा असलेले कोणते राजकीय पक्ष जवळ येऊ शकतात, यावरही चर्चा होत असल्याचे सूत्रांचे मत आहे. तसेच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी नेतृत्व करावे की ममता बॅनर्जी यांनी यावरही चर्चा होत असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

  त्यांनी राजकारणाचे क्षेत्र आता सोडले आहे

  दरम्यान, पुण्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना माध्यमांना सांगितले की, “प्रशांत किशोर यांनी मी कोणत्याही निवडणुकीत सहभागी होणार नसल्याचे सांगितले आहे. आता त्यांचे मागील काही अनुभव असतील, वेगळी काही कामे असतील. पण त्यांनी राजकारणाचे क्षेत्र आता सोडले आहे. त्यामुळे त्या क्षेत्राची चर्चा होण्याचे कारण नाही.