कंगनासाठी भाजपमध्ये तयार होतेय राजकीय व्यासपीठ

मुंबई: अभिनेत्री कंगना रणौतच्या(kangna ranawat) विवादास्पद वक्तव्यांनतरही भाजपाची(bjp) वरिष्ठ फळी ज्या पद्धतीने कंगनाचे समर्थन करीत आहे, यातून भाजपा कंगनासाठी राजकीय व्यासपीठ तयार करीत असल्याचे स्पष्ट होते आहे. हेमा मालिनी, स्मृती इराणी, किरण खेर, रुपा गांगुली यांच्यानंतर ज्या फिल्मी चेहऱ्यांच्या शोधात भाजपा आहे, त्यात कंगनाला वरचे स्थान मिळण्याची शक्यता आहे.

कंगना-शिवसेना वाद(kangna shivsena dispute) सुरु सताना केंद्र सरकारने ज्या तत्परतेने कंगनाला वाय दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली, यातून कंगनाला बळ देत आगामी काळात कंगना भाजपात प्रवेश करणार असल्याचेही संकेत मिळाल्याची चर्चा आहे. हा प्रवेश आत्ता झाला नाही, तरी आगामी काळात कंगनाचा भाजपा प्रवेश निश्चित मानण्यात येतो आहे. कंगनाच्या प्रसिद्धीचा आणि भूमिकांचा फायदा घेत, मोठ्या संख्येने असलेल्या तरुणांच्या वोटबँकेवर भाजपाचा डोळा असल्याचे मानण्यात येते आहे.
आज मुंबई महापालिकेने कंगनाच्या कार्यालयात पाडकाम केल्यानंतर, ज्या पद्धतीने भाजपाच्या छोट्या कार्यकर्त्यांपासून ते मोठ्या नेत्यांपर्यंत सगळ्यांनी कंगनाच्या समर्थनाची भूमिका घेतली. त्यावरुन कंगनाला भाजपाने राजकीय आश्रय दिल्याचे अगदी स्पष्ट झाले आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या गूढ मृत्यूनंतर कंगनाने ज्या पद्धतीने पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले. बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनकडे इशारा करतानाच, स्वत:ची ड्रग्ज चाचणी करण्याचे आव्हान सरकारला दिले. त्याला ज्या पद्धतीने भाजपाच्या नेत्यांनी समर्थन दिले, त्यावरुन कंगना ही आगामी काळात बॉलीवूडमधील भाजपाचा नवा चेहरा असणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. कंगनाच्या भाजपा प्रवेशापूर्वी, तिच्यासाठी गेल्या काही वर्षांपासून नियोजनबद्ध रणनीती आखण्यात आल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. तिच्यासाठी योग्य राजकीय व्यासपीठ तयार करण्याचा यामागचा प्रयत्न आहे.

पद्मश्रीने सन्मानित असलेल्या कंगनाने गेल्या दोन वर्षांपासून राष्ट्रवादाची कास धरली आहे. भाजपाच्या पावलावर पाऊस ठेवत तिने भूमिका गेतल्या आहेत. भाजपाच्या राजकीय विरोधकांना अंगावर घेण्याचे कामही कंगनाने केले आहे. त्याचबरोबर बॉलीवूडमधील प्रस्थापितांच्या विरोधात सोशल मीडियावर भाष्य करत, त्यांचे वैरही तिने पत्करण्यातही तिने आढेवेढे घेतलेले नाहीत.
कंगनाला न्याय मिळावा, यासाठी कंगनाच्या पाठिशी उभे असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे म्हणणे आहे. तिच्या मुंबईची तुला पीओकेशी करण्याच्या वक्तव्यावर तिला पाठिंबा नाही, मात्र सरकार तिला ज्या सूडबुद्धीने वागणूक देत आहे, त्याचा निषेध असल्याचे भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केले आहे. यात कोणतेही राजकारण नसल्याचा दावाही भाजपा नेते करीत आहेत.

एका आमदाराची नात असलेली आणि उद्योगपतीची मुलगी असलेली कंगना उद्या राजकारणात आली, तर तिला राजकारणाचे धडे शिकण्यास फारसा वेळ लागणार नाही, अशीही चर्चा आहे. सध्या भाजपाकडे सेलिब्रिटींच्या चेहऱ्यांची मांदियाळी आहे. त्यात गेल्या काही वर्षांमध्ये जया प्रदापासून ते इशा कोप्पीकरपर्यंत अनेक सेलिब्रिटींनी भाजपाचा आसरा घेतलेला आहे. यात मौसमी चॅटर्जी, पूनम ढिल्लो, सनी देओल, रवी किशन, मनोज तिवारी, स्पोर्ट्स क्षेत्रातील सायना नेहवाल, गौतम गंभीर, बबिता फोगट यासारख्या नावांचा समावेश आहे. मात्र यातील काही चेहरे वगळता बाकीचे सेलिब्रीटी हे फारसे पक्षकार्यात दिसून येत नाहीत. कंगनासारख्या आक्रमक भूमिकेच्या सेलिब्रिटींची यासाठीच पक्षाला आवश्यकता आहे.