राजकारण्यांनी भान ठेवावं; धनंजय मुंडे प्रकरणी प्रतिक्रिया देताना संजय राऊतांनी राजकारण्यांना दिला महत्वाचा सल्ला

धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने काय भूमिका घ्यायची हे तेच ठरवतील. राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सोपवले आहे.

मुंबई : बलात्काराच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत. भाजपकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. धनंजय मुंडे प्रकरणी प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक सल्ला दिला आहे.

हे प्रकरण धनंजय मुंडे यांची कौटुंबिक आणि खासगी बाब असल्याचे सांगितले. त्यामुळे यावरुन कोणतेही राजकारण होता कामा नये, असे राऊतांनी म्हटले.खासगी आणि कौटुंबिक गोष्टी या त्याच पातळीवर सोडवायच्या असतात. त्यामध्ये राजकारण आणायचे नसते. विशेषत: राजकारण्यांनी या गोष्टीचे भान ठेवले पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने काय भूमिका घ्यायची हे तेच ठरवतील. राष्ट्रवादीचे नेते सुजाण आणि प्रगल्भ आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याबाबत काय निर्णय घ्यायचा हे राष्ट्रवादीच्या नेत्यांवर सोपवले आहे.

राजकीय विषयात आरोप-प्रत्यारोप करण्यास हरकत नाही. पण कौटुंबिक विषयात कोणीही राजकारण करु नये. ते राजकारणाचे विषय नसतात. राजकारणात एका उंचीवर, शिखरावर जाण्यासाठी खूप कष्ट, संघर्ष करावे लागतात. एका क्षणात चिखलफेक करुन संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करत असतो. हे राजकीय लोकांनी आपापसात करु नये हे आम्हाला बाळासाहेब ठाकरेंनी शिकवल आहे. शरद पवारांनी सांगितलं आहे,” असं संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं.