उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री
उध्दव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल जनतेशी थेट संवाद साधताना जाहीर केलेल्या न्हावा शेवा पाणीपुरवठा टप्पा -३ या योजनेच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,  ‘प्रदूषणकारी राक्षस आपल्याला परवडणार नाही. हा जीवघेणा विकास आहे. काही विशिष्ट कारखान्यांची खूप आवश्यकताच असेल तिथे लोकसंख्येपासून दूरवर किंवा ओसाड ठिकाणी सुविधा देऊन उभारावेत. वनसंपदा का  नष्ट करायची ?

  • न्हावा शेवा पाणीपुरवठा टप्पा ३ चा मुख्यमंत्र्याच्या हस्ते शुभारंभ

मुंबई (Mumbai). मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी काल जनतेशी थेट संवाद साधताना जाहीर केलेल्या न्हावा शेवा पाणीपुरवठा टप्पा -३ या योजनेच्या कामाचा शुभारंभ केला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की,  ‘प्रदूषणकारी राक्षस आपल्याला परवडणार नाही. हा जीवघेणा विकास आहे. काही विशिष्ट कारखान्यांची खूप आवश्यकताच असेल तिथे लोकसंख्येपासून दूरवर किंवा ओसाड ठिकाणी सुविधा देऊन उभारावेत. वनसंपदा का  नष्ट करायची ? ते म्हणाले की, कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात सुविधा मिळत नव्हत्या. त्या काही महिन्यात प्रदूषणाची पातळी खूप कमी झाली होती. आता परत काही दिवसांपासून हवेचे प्रदूषण वाढले आहे. प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार वाढू लागले आहेत.

पिण्याचे पाणी गावागावात
मुख्यमंत्री म्हणाले की, स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होतील पण पिण्याचे पाणी गावागावात घेऊन जाऊ शकलो नसलो तर काही अर्थ नाही. मंगळावर पाणी सापडले आहे किंवा नाही हे उत्सुकतेने आपण तपासतो पण अगोदर  आपण आपल्याकडील मुलभूत सुविधा आहेत का ते पहावे. मुंबईच्या जवळच्या रायगड जिल्ह्यात लोकसंख्या वाढत आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आपण नाही केली तर भविष्यात गंभीर समस्या निर्माण होईल. वेळेत नव्हे तर वेळेआधी हा प्रकल्प पूर्ण करा, त्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल असे आश्वासनही त्यांनी दिले.   ये म्हणाले की, रायगडच नव्हे तर आपल्याला संपूर्ण महाराष्ट्र सजलाम सुफलाम करायचा आहे.

नियम पाळून कार्यक्रम
भाषणाच्या सुरूवातीला मुख्यमंत्री म्हणाले की, ‘मी आयोजकांना धन्यवाद देतो. कालच मी फेसबुक लाईव्हमधून प्रेमाने आणि हक्काने सुचना दिल्या होत्या. एकीकडे मी सांगतोय की सार्वजनिक कार्यक्रम करू नका आणि आज आपण हा रायगड येथील कार्यक्रम करतोय पण हा कार्यक्रम जनतेच्या जिव्हाळ्याचा आणि पाण्याशी संबंधित आहे.  मी आयोजकांना धन्यवाद देतो की त्यांनी आरोग्याचे काटेकोर नियम पाळून हा कार्यक्रम आयोजित केला.  पाणी म्हणजे आयुष्य आहे, विकासाच्या अनेक गोष्टी आपण करतो. मेट्रोचे कोचेस देशात बनवतो आहोत, उद्या आपल्या राज्यातही हे कोचेस बनतील. अनेक गोष्टी आपण उत्पादित करू शकतो मात्र पाणी आपण बनवू किंवा निर्माण करू शकत नाही हे सत्य आहे. एकदा हे स्वीकारल्यानंतर मग आपल्या हाती असते ते उपलब्ध पाणी कसे जपून वापरू ते.

निसर्गाचा ऱ्हास नको
तहान लागली की विहीर खणतो. पाण्याची पातळीही  खूप खोल जाते आहे. मी जव्हारला गेल्या आठवड्यात गेलो होतो, ते पूर्वी हिल स्टेशन होते आणि पुढेही आपण त्याला चांगले विकसित करणार आहोत पण पाण्याचे दुर्भिक्ष काय असते ती भीषण वस्तुस्थिती तिथे गेल्यावर पहायला मिळते. परवा नीती आयोगाच्या बैठकीत मी मांडले की, ज्या विकासाच्या मागे आपण लागलो आहोत ते करताना निसर्गाचा ऱ्हास होता कामा नये. कोकणात सुंदर निसर्ग संपदा आहे, दुसरीकडे समुद्र किनारे आहेत पण पर्यावरणाला धोका पोहचवून केलेला विकास आपल्याला नको असे ते म्हणाले.

राजभवनची धावपट्टी नको रे बाबा!
या कार्यक्रमाला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यानी आजही राजभवन येथील धावपट्टीचा वापर टाळून महालक्ष्मी रेसकोर्स येथील खाजगी धावपट्टीवरून  उड्डाण करणे पसंत केले. त्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विमान प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यानी राजभवनची धावपट्टी वापरणे कायमचे सोडून दिल्याची चर्चा माध्यमातून सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिस-यांदा मुख्यमंत्र्यानी बाहेर जाताना राजभवनच्या धावपट्टीला जाणे टाळले आहे. मात्र महालक्ष्मी रेसकोर्स यथील धावपट्टी सोयीची असल्याने मुख्यमंत्र्यानी येथून उड्डाण केले असावे असे त्यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले.