माघी गणेशोत्सवात पीओपीचा वापर करता येणार; मुर्तीकार, कारागीरांना मोठा दिलासा!

कोरोना मुळे यावर्षी हा उद्योग अडचणी आला आहे. त्यामुळे याबाबत तोडगा निघावा, अशी विनंती करीत नुकतेच मुर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे शिष्टमंडळाने आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुंबईत भेट घेतली होती.

मुंबई: पीओपी वापर व पर्यावरणावर होणारे परिणाम याबाबत अभ्यास करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आल्याने या कमिटीचा अहवाल येईपर्यंत पीओपीवरील बंदी स्थगित करण्यात यावी असे निर्देश आज केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव प्रशांत गार्गव्ह यांना दिले आहेत.त्यामुळे माघी गणेशोत्सवात पीओपीच्या मुर्तीवर बंदी राहणार नाही, अशी माहिती भाजपा नेते आमदार अँँड आशिष शेलार यांनी दिली.  महाराष्ट्रातील सुमारे ५ लाख मुर्तीकार, कारागीरांचे गाऱ्हाणे आज पुन्हा भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे मांडले. महाराष्ट्रात माघी गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आहे त्यामुळे याबाबत तोडगा काढावा अशी विनंती आमदार अँड आशिष शेलार यांनी मंत्री जावडेकर यांना केली.

पीओपीवरील बंदी मुळे हजारो गणेश आणि दुर्गा मुर्तीकार अडचणीत आले आहेत. या व्यवसायात 5 लाखाहून अधिक कारागीर, मुर्तीकार, कारखानदार यांचा रोजगार अवलंबून आहे. कोरोना मुळे यावर्षी हा उद्योग अडचणी आला आहे. त्यामुळे याबाबत तोडगा निघावा, अशी विनंती करीत नुकतेच मुर्तीकार आणि सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे शिष्टमंडळाने आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची मुंबईत भेट घेतली होती. यामध्ये गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अँड नरेश दहिबावकर महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघाचे अध्यक्ष जयेंद्र साळगावकर, अखिल सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष हितेश जाधव यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यावेळी अभ्यास गट स्थापन करण्यात येईल असे मंत्र्यांनी सांगितले होते. त्यानुसार केंद्रीय पर्यावरण विभागाने दिल्ली आयआयटीच्या केमिकल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे प्रमुख प्रा. के. के. पंत, प्रो. सी बालोममुमदार यांच्या सह पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोग शाळेच्या डाँ शुभांगी उंबरकर, डाँ. मोहन डोंगरे यांच्यासह वॉटर क्वलिटी मॅनेजमेंट विभागाचे सेक्रेटरी जे. चंद्राबाबू यांची कमिटी गठीत केेेली. त्यामुळे या समितीचा अहवाल येईपर्यंत बंदीला स्थगिती देण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत.

मोठा दिलासा देणारा निर्णय- अँड नरेश दहिबावकर अध्यक्ष,बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती

गेली वर्षभर आम्ही या विषयावर राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. आमदार अँड आशिष शेलार यांनी पक्षीय राजकारण बाजुला ठेवून उत्सवाप्रती प्रेम दाखवून या कामी पुढाकार घेतला. भाद्रपद गणेशोत्सवात जशी पीओपी वापराला सूट मिळवून दिली तशीच सूट आता माघी गणेशोत्सवासाठी मिळाली त्यामुळे विघ्न टळले आहे. आम्ही आमदार अँड आशिष शेलार आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचे आभार मानतो.

मुर्तीकारांना गणेश पावला – नाना तोंडवलकर, अध्यक्ष, बृहन्मुंबई गणेश मूर्तिकार संघ

भाद्रपद गणेशोत्सव काळात कोरोनामुळे आमचे मूर्तिकार अडचणीत आले होते. त्या अडचणींवर मात करत आता माघी गणेशोत्सव काळात आमचा व्यवसाय पुढे जाईल, कारागीरांना रोजगार मिळेल अशी अपेक्षा असताना पीओपी वरील बंदी ही मोठी अडचण होती. त्यामुळे आमदार अँड आशिष शेलार यांनी या कामी पुढाकार घेऊन सतत पाठपुरावा करून तूर्तास त्याला स्थगिती मिळवून दिली. त्यामुळे लाखो मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.आम्हा मूर्तिकारांना, कारागिरांना यावर रोजगार अवलंबून असणाऱ्यांंना गणपती बाप्पाचा आशीर्वाद मिळाला आहे.

आनंदाची बातमी! जयेंद्र साळगावकर, अध्यक्ष, महाराष्ट्र गणेशोत्सव महासंघ

ही बातमी आनंदाची आहे.आमचे मूर्तिकार व गणेशोत्सव मंडळे मोठ्या अडचणीत होते त्यातून दिलासा देण्याचे काम आमदार आशिष शेलार आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले आहे. त्याबद्दल दोघांचेही आभार आणि पीओपीवर पर्यावरण पूरक तोडगा ही लवकरच निघेल अशीही आशा आहे.

माघी गणेश आणि चैत्र नवरात्रीला मोठा दिलासा -हितेश जाधव अध्यक्ष, अखिल सार्वजनिक उत्सव समिती

कोरोनामुळे यावर्षी भाद्रपद गणेशोत्सवात अनेक अडचणी आल्या त्यानंतर आता पीओपी बंदीमुळे माघी गणेशोत्सव आणि चैत्र नवरात्र उत्सव कसा साजरा होणार? पीओपी मूर्ती नाही तर मग मूर्ती कशा उपलब्ध होणार? असे असंख्य प्रश्न असताना आमदार आशिष शेलार यांनी याकामी पुढाकार घेतला. आमचे गार्‍हाणे ने दिल्लीपर्यंत मांडले आणि त्यातून केंद्रीय मंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती देऊन आम्हाला मोठा दिलासा दिला आहे आम्ही दोघांचेही मनापासून आभार मानतो