फास आवळणारच! राज्यात मर्यादित टाळेबंदीची शक्यता, अर्थकारणाला धक्का न लागू देता मानवी चेहरा जपणाऱ्या नियमावलीचे स्वरूप अंतिम टप्प्यात :  मंत्रालयातील उच्च पदस्थांची माहिती

मागील वर्षी म्हणजेच २५ मार्च रोजी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत २१ दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा केली होती. नंतर त्याचा कालावधी वाढत गेला. मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, सध्या आरोग्य यंत्रणेवर जो ताण आहे तो येत्या महिनाभरात मर्यादेबाहेर वाढल्यास आवाक्याबाहेर जावू नये यासाठी लोकांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

  किशोर आपटे, मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढला असताना आरोग्य यंत्रणांवर ताण येत आहे, त्यामुळे येत्या २ एप्रिलपासून कोरोना निर्बंध कठोर करण्याचा निर्णय राज्य सरकारला घ्यावा लागणार असल्याची माहिती मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे. या सूत्रांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, एका प्रकारे मर्यादित स्वरूपाची टाळेबंदी लावण्याची तयारी सुरु झाली असून मागील वर्षी लावण्यात आलेल्या टाळेबंदी पेक्षा ही टाळेबंदी काहीशी वेगळी असेल. यावेळी पन्नास टक्के टाळेबंदीचे निर्बंध असतील. अशी माहिती या सूत्रांनी दिली आहे.

  आरोग्य यंत्रणेवर ताण

  मागील वर्षी म्हणजेच २५ मार्च रोजी देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत २१ दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा केली होती. नंतर त्याचा कालावधी वाढत गेला. मंत्रालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले की, सध्या आरोग्य यंत्रणेवर जो ताण आहे तो येत्या महिनाभरात मर्यादेबाहेर वाढल्यास आवाक्याबाहेर जावू नये यासाठी लोकांना कठोर निर्बंधांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

  टाळेबंदीला मानवी चेहरा

  यापूर्वीच्या टाळेबंदीमध्ये सगळ्याच गोष्टी बंद करण्याचे आदेश होते. यावेळी मात्र गर्दीच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घातले जाणार आहेत. त्यात शॉपिंग मॉल, मल्टिप्लेक्स, समुद्र किनारे, सार्वजनिक उद्याने, नाट्यगृह. रेल्वे आणि बस स्थानकांवर विशेष निर्बंध घालण्यात येणार आहेत. या सूत्रांनी सांगितले की, राज्याच्या वैद्यकीय सुविधांची एक मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त कोरोना रुग्णसंख्येचा स्फोट होण्याची शक्यता आहे, त्यातच कोरोना आता बदलत्या रूपात येत असल्याने विशेष काळजी घेण्याची गरज आहे. मात्र सध्या लसीकरण सुरू असल्याने काहीशी बेफिकीरवृत्ती, निष्काळजीपणा आणि बेदरकारपणाने लोक वागताना दिसत आहेत.

  हळूहळू कडक निर्बंध

  याबाबत अधिक माहिती देताना या सूत्रांनी सांगितले की, लग्नसोहळ्यांना जी संख्या मर्यादा आहे त्यापेक्षा जास्त लोक गर्दी करत आहेत. त्यामुळे मिशन बिगीन अगेन मध्ये जसे निर्बंध हळूहळू शिथिल करण्यात आले तसेच आता ते हळूहळू कडक केले जाण्याची शक्यता आहे. यावेळी विशिष्ट वेळेत टाळेबंदी शिथिलता दिली जाण्याची शक्यता आहे. अनेक शहरात रात्रीच्या संचारबंदीसह कंटेनमेन्ट भागात दिवसाच्या संचारबंदीपर्यत हे निर्बंध वाढविले जाण्याची शक्यता आहे. या सूत्रांनी सांगितले की दक्षिण आशिया मधील सिंगापूर हाँगकाँग सारख्या देशांनी ज्या प्रकारे कोरोनाच्या काळात निर्बंध घालून कोरोनामुक्ती मिळवली त्याबाबत सरकारने अभ्यास केला आहे. त्याच धर्तीवर लोकांच्या सहकार्यातून कठोर निर्बंध घालण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

  प्रवास बंदीचा निर्णय टप्प्याटप्याने

  या काळात आंतरजिल्हा प्रवास बंदीचा निर्णय टप्प्याटप्यात केला जाण्याची शक्यता आहे. आंतरजिल्हा वाहतूक बंद केल्याने औद्योगिक आणि कृषी क्षेत्राचे नुकसान होणार नाही असा प्रयत्न सरकार करणार आहे. रेल्वेस्थानकांवर तसेच बसस्थानकांवर कोरोना चाचण्या अनिवार्य करण्याबाबत धोरण सरकारने ठरवले असून जास्तीत जास्त चाचण्या करुन कोरोना रुग्णांना विलगीकरण करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. त्याशिवाय लसीकरणाचीही गती वाढवून निवडणुकांच्या धर्तीवर लसीकरण केले जाणार आहे. अर्थकारणाला धक्का न लागू देता, टाळेबंदी करण्याचा प्रयत्न सरकारचा असला तरी यासाठी मास्क, सोशल डिस्टसिंग आणि काही लक्षणे दिसणाऱ्यांच्या तातडीने चाचण्या करण्याचे धोरण राबविण्यात येणार आहे.