पवई तलाव ओव्हर फ्लो ; गतवर्षीच्या तुलनेत २४ दिवस आधीच भरून वाहू लागला

गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले.

    मुंबई:महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा महानगरपालिकेचा पवई तलाव शनिवारी दुपारी तीन वाजता पूर्ण भरून वाहू लागला. हाच तलाव गेल्या वर्षी ५ जुलै २०२० रोजी पहाटे ६ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता. ही बाब लक्षात घेतल्यास गेल्यावर्षीपेक्षा यंदा हा तलाव सुमारे २४ दिवस आधी भरून वाहू लागला आहे.

    ५४५ कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मानवाला पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली.महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे ४० लाख रुपये एवढा खर्च त्यावेळी आला होता.तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लीटर (५४५५ दशलक्ष लिटर) पाणी असते.हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.