विजेचा खेळ खंडोबा: ऑनलाईन परीक्षेमध्ये अडथळा; विद्यार्थ्यांची ट्विटरवर तक्रार

मुंबईमध्ये वीजपुरवठा अनेक ठिकाणी खंडित झाला आहे. पॉवर ग्रीड फेल्युअरमुळे एकाच वेळी मुंबईतील अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याचे वृत्त आहे. बेस्टने यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली असून टाटाकडून येणाऱ्या विद्युत पुरवठ्यात बिघाड झाल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याचे बेस्टने म्हटलं आहे. मुंबईमध्ये वीजपुरवठा करणाऱ्या महावितरण, अदानी, बेस्ट, टाटा अशा सर्वच वीज वितरकांच्या सेवेला या ग्रीड फेल्युअरचा फटका बसला आहे. महापारेषणच्या कळवा- पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर व नवी मुंबई मधील वीज खंडीत झाली. याचा परिणाम ऑनलाई परीक्षांवर झाला. वीज पुरवठा खंडित झाल्याने विद्यार्थ्यांनी ट्विटरवर ऑनलाईन परीक्षा देण्यात अडथळा येत असल्याचं सांगत यासंदर्भात तक्रार केली आहे. ऑनलाईन परिक्षा नियोजित असल्याने वीज पुरवठा लवकरात-लवकर सुरू करावा, यासाठी अनेकांनी अदानी आणि टाटा सारख्या वीज पुरवठादारांना ट्विट केले आहे.

 

मुंबईमध्ये अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे. आज सकाळपासून वीज गायब झाली आहे. ग्रीड फेल्युअरमुळे मुंबईतील वीज गायब झाल्याची माहिती आहे. एमएसईबी, बेस्ट आणि अदानीची वीज गेल्यांमुळे मुंबई शहरातील कार्यालयांचा कारभारही ठप्प पडला आहे. याचा परिणाम लोकल सेवांवरही झाला असून मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. लोकलही जागच्या जागी उभ्या आहेत. संपूर्ण एमएमआरडीए क्षेत्रात या ग्रीड फेल्युरचा फटका पाहायला मिळतो आहे.(electricity supply shortage in mumbai)