राऊतांना पडलाय ‘या’ गोष्टीचा विसर पण राष्ट्रवादीसोबत तीच गोष्ट ते अत्यंत इमानदारीने करतात; दरेकर यांचा खोचक टोला

संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते याअर्थी केल्याचं दिसून येत आहे. आपल्या पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि संजय राऊत काहीही बोलत नाहीत, मात्र राष्ट्रवादीची पाठराखण अत्यंत इमानदारीने करत आहेत.

    मुंबई : सध्या राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडींमुळे महाविकास आघाडी सरकार समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. तर, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर व भाजपाने आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याने, राष्ट्रवादी काँग्रेससमोर देखील मोठा पेच निर्माण झाल्याचे दिसत आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडून केल्या जात असलेल्या वक्तव्यांवरून प्रवीण दरेकरांनी त्यांना खोचक टोला दिला आहे.

    “संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते याअर्थी केल्याचं दिसून येत आहे. आपल्या पक्षाच्या मंत्र्याचा राजीनामा घेतला जातो आणि संजय राऊत काहीही बोलत नाहीत, मात्र राष्ट्रवादीची पाठराखण अत्यंत इमानदारीने करत आहेत.” अशा शब्दांमध्ये विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

    “संजय राऊत यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रवक्ता म्हणून केलं की काय? अशा प्रकारची शंका निश्चितपणे मला वाटते आहे. याचं कारण ज्या वेळेला संजय राठोड त्या पक्षाचे नेते ज्यांनी शिवसेनेसाठी खस्ता खाल्ल्या, बंजारा समाज त्यांनी शिवसेनेच्या मागे उभं केलं. त्यांनी केलेलं कृत्य अयोग्य आहे, त्या विषयी दुमत असण्याची काहीच कारण नाही. परंतु त्यावेळेला चौकशीसाठी राजीनामा आवश्यक वाटला, म्हणजे आपल्या पक्षाचा कार्यकर्ता आपल्या पक्षचा नेता, त्याचा राजीनामा घेतला जातो तेव्हा संजय राऊत याचं वक्तव्य येत नाही, की चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही म्हणून, मग जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं? की कशासाठी माहिती नाही. परंतु त्याचवेळेला शिवसेनेच्या कार्यकर्त्याची, नेत्याची पाठराखण करायला विसर पडलेले संजय राऊत हे राष्ट्रवादी काँग्रेसची भलामन पाठराखण अत्यंत इमानदारीने करताना दिसतात. म्हणून अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी राजीनाम्याची आवश्यकता नाही, असा निर्वाळा देताना संजय राऊत या ठिकाणी दिसतात.” असं दरेकर म्हणाले.