‘गॅग’ चा आदेश तात्काळ मागे घ्या – विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची पोलीस महासंचालकांकडे मागणी

मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारने कायद्याच्या १४४ कलमाचा आधार घेऊन व्हॉटस अॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मिडियाच्या माध्यमांची मुस्कटदाबी करण्यासाठी मुंबई शहरासाठी नवीन ‘गॅग’ आदेश

मुंबई: महाविकास आघाडीच्या सरकारने कायद्याच्या १४४ कलमाचा आधार घेऊन व्हॉटस अॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मिडियाच्या माध्यमांची मुस्कटदाबी करण्यासाठी मुंबई शहरासाठी नवीन ‘गॅग’ आदेश काढले आहेत, नागरिकांचा मुलभूत अधिकार दाबण्याचा हा प्रकार असून, हा ‘गॅग’ आदेश पोलीस प्रशासनाने तात्काळ मागे घ्यावा, अशी आग्रही मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची भेट घेऊन केली. यावेळी आमदार प्रसाद लाड, आमदार राहुल नार्वेकर उपस्थित होते. 

पोलीस महासंचालकांच्या भेटीनंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना प्रविण दरेकर यांनी सांगितले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन दुटप्पी भूमिका घेत आहेत. आमच्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून अटक करण्यात येत आहे, व त्यांना मारहाण होत आहे. पण त्याच वेळी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील सोशल मिडियामध्ये होणा-या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल तक्रारी केल्या असताना व फडणवीस यांना जीवे मारणाच्या धमक्या प्रकरणी पोलिसांकडे रितसर तक्रारी करुनही पोलिसांकडून मात्र काहीच कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. 

सीआरपीसी कायदयाच्या १४४ कलमाच्या आधार घेऊन लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या सोशल मिडिया व मिडीयाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात येत असल्याचा आरोप करताना दरेकर म्हणाले की लोकशाहीमध्ये नागरिकांना त्यांच्या भावना व मते व्यक्त करण्याचा आहे, पण १४४ कलमाचा आधार घेऊन लोकशाही स्वातंत्र्यांवर गदा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, त्यामुळे पोलिस प्रशानसाने आता गॅग आदेश मागे घ्यावी. भारत हा लोकशाहीप्रधान देश आहे, यामध्ये प्रत्येकाला आपली मते व भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. तो आमचा अधिकार कोणाला हिरावून घेता येणार नाही. अशी ठाम भूमिका आम्ही पोलिस महासंचालकांना सादर केलेल्या निवेदनात मांडली असल्याचेही दरेकर यांनी स्पष्ट केले.  

काही दिवसांपूर्वी मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेऊन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात होणाऱ्या सोशल मीडियामध्ये ट्रोलिंग करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याची मागणी केली होती. पण दुर्दैवाने याविरुध्द अद्यापही कोणताही कारवाई करण्यात आलेली नाही. पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाखाली काम करित आहे. आमच्या कार्यकत्यांचा विरोधात कारवाई व अटक केली जात आहे, त्यामुळे पोलिसांची अश्या प्रकारची धाकटदडपशाही चालणार नाही असा इशारा देताना दरेकर यांनी स्पष्ट केले , ज्या आमच्या तक्रारी आहेत त्यांचे एफआयआरमध्ये रुपांतर करुन संबंधितांविरुध्द योग्य कारवाई करण्याची मागणी पोलिस महासंचालक यांच्याकडे आज करण्यात आली आहे. मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे जाऊनही न्याय मिळाला नाही, त्यामुळे तुम्ही आता न्याय द्या व तुम्हीही न्याय दिला नाही तर वेळ पडल्यास आंदोलन व उपोषणाचा मार्ग निवडावा लागेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले. 

कोरोनाच्या संकटमय परिस्थितीत लढणाऱ्या पोलिसांवर आजही हल्ले होत आहे. काही ठराविक प्रवृत्ती व ठराविक ठिकाणी पोलिसांवर हल्ले करित आहे, त्यांना मारहाण करित आहे, त्यामुळे पोलिसांचे मनोधैर्य खचले आहे. त्यामुळे पोलिसांसारखे कोविड योध्दे या परिस्थितीत हतबल झाले तर कोरोनाला सामोरे जाऊ शकत नाही. पोलिसांचे मनोधैर्य वाचविण्यासाठी पोलिस प्रमुख या नात्याने ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे, असेही दरेकर यांनी सांगितले. 

जुन्नर येथे अपंग व विधवांसाठी सामाजिक कार्य करणाऱ्या बोराडे नावाचा तरुणाला काँग्रेसचे नेते शेरकर यांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणाची चौकशी करावी. कारण सामिजाक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकत्याला अशी मारहाण होणार असतील तर ते योग्य नाही, त्यामुळे जुन्नरच्या पोलीस अधिक्षकांना आदेश देऊन काँग्रेसच्या नेत्याविरुध्द कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आल्याची माहिती दरेकर यांनी दिली.