pravin darekar

अंबानी स्फोटक प्रकरणातील सचिन वाझे(sachin waze) यांच्या कथित सहभागामुळे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याची नामुष्की सरकारवर आली असून, ठाकरे सरकारने पोलीस दलात बदल्यांचा बाजार मांडला आहे, अशी टीका प्रविण दरेकर(pravin darekar) यांनी केली आहे.

  मुंबई: याआधीच्या निलंबन काळात वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि शिवसेनेचे धनंजय गावडे यांनी माहिती अधिकाराचा वापर करुन अनेक विकासकांना ब्लॅकमेल केल्याचा गंभीर आरोप करुन, त्या प्रकरणांची सखोल चौकशी करण्याची मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केली. अंबानी स्फोटक प्रकरणातील सचिन वाझे यांच्या कथित सहभागामुळे पोलीस दलात मोठे फेरबदल करण्याची नामुष्की सरकारवर आली असून, ठाकरे सरकारने पोलिस दलात बदल्यांचा बाजार मांडला आहे, अशी टीका प्रविण दरेकर यांनी केली आहे.

  बदली संदर्भात संजय पांडेही नाराज

  स्फोटक प्रकरणाच्या आधी निलंबनाच्या काळात वादग्रस्त पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी संस्था स्थापन केली होती असा दावा करुन त्या काळातील वरील प्रकरणांचीही चौकशी व्हायला हवी असे प्रवीण दरेकर यांचे म्हणणे आहे. पोलीस दलात होणार्‍या बदली संदर्भात संजय पांडे नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे, असे दरेकर म्हणाले.

  आपली क्षमता असूनही दरवेळी आपणास डावलण्यात आले. क्षमता असतानाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालकपद मिळाले नाही. संजय पांडे यांच्यासारखा आयपीएस अधिकारी आपल्यावर झालेल्या अन्यायाची कैफियत मांडतो हे गंभीर आहे, असा आरोप दरेकर यांनी केला.

  महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे प्रमाण वाढले

  मुंबई पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती झाल्यानंतर पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्विकारल्यानंतर हेमंत नगराळे यांनी पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली असून, पुन्हा गतवैभवाचे दिवस आणायचे आहेत असे म्हटले आहे, याकडेही दरेकर यांनी लक्ष वेधले आहे.

  राज्यात महिलांवर होणार्‍या अत्याचाराचे प्रमाण वाढले असून, सचिन वाझेसारखा खाकी वर्दीतील माणूस अनेक सहभागी असल्याचा आरोपही दरेकर यांनी केला. या सरकारचे कायदा व सुव्यस्थेवर कोणतेही नियंत्रण नसून, पोलिस दलाच्या बदनामीस सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे, अशी टीकाही प्रविण दरेकर यांनी केली आहे.