खबरदारीचा उपाय : धारावीत कोरोना विरोधातील कारवाई वाढली ; चाचण्या आणि निर्जंतुकीकरणावर भर

सध्या धारावी, सायन, दादर माहीम परिसरात १० पेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत. मात्र तरीही जी उत्तर वॉर्ड प्रशासनाकडून या परिसरात कोरोनाविरोधात निर्जंतुकीकरण, चाचण्या आणि जनजागृती अशी जोरदार मोहीम सुरू केली आहे. गेल्या ८ ते १० दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही ८ टक्क्यांनी वाढली आहे.

  मुंबई: सध्या मुंबई पालिका क्षेत्रातील १८ ठिकाणी कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. दरम्यानच्या काळात धारावी मात्र शांत आहे. धारावीची स्थिती मागील वर्षाप्रमाणे होवू नये, म्हणून वॉर्ड अधिकाऱ्यांकडून काळजी घेतली जात आहे व नागिरकांमध्ये जनजागृती केली जात आहे.
  गेल्या वर्षी धारावी कोरोनाचा हॉटस्पॉट झाली होती. तर त्याला बाजूच्या दादर-माहीम परिसरात ही उद्रेक दिसून आला होता.

  सध्या धारावी, सायन, दादर माहीम परिसरात १० पेक्षा कमी रुग्ण आढळून येत आहेत. मात्र तरीही जी उत्तर वॉर्ड प्रशासनाकडून या परिसरात कोरोनाविरोधात निर्जंतुकीकरण, चाचण्या आणि जनजागृती अशी जोरदार मोहीम सुरू केली आहे. गेल्या ८ ते १० दिवसांत मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ही ८ टक्क्यांनी वाढली आहे.

  याचा विचार करत निर्जंतुकीकरण तसेच कोरोना चाचण्या आणि जनजागृतीत आणखी मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य खात्यामार्फत विभागीय स्तरावर कोरोना चाचण्यांचे प्रमाण रुग्णवाढीचा दर लक्षात घेऊन वाढवले जात आहे.
  धारावीसारख्या झोपडपट्टीच्या भागात तसेच दादर, माहीममधील अधिक जोखीम असलेल्या क्षेत्रात फिरत्या वाहनामार्फत कोरोना चाचण्या केल्या जात आहेत.

  याबाबत जी नॉर्थ विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी सांगितले कि, परिसरासह बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांची देखील चाचणी करण्यात येत आहे. दादर रेल्वे स्थानकावर इतर राज्यांमधून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांची रेल्वे स्थानकावर स्क्रिनिंग व कोरोनासदृश लक्षणे असणाऱ्या प्रवाशांची मोफत चाचणी करून पॉझिटीव्ह आल्यास विलगीकरणासाठी विलगीकरण कक्षात पाठवण्यात येत असल्याचे ते म्हणाले. तर परिसरातील व्यापारी आस्थापनांमधील मालक, चालक तसेच इतर कर्मचारी वर्गाची तपासणी करण्यात येत आहे.

  जी/उत्तर विभाग व स्नेहा सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन झिरो’ कार्यक्रम राबवला जात आहे. कोरोना गेला नसल्याने सतत हात धुणे, मास्क लावणे आणि सामाजिक अंतर पाळणे गरजेचे आहे या गोष्टींची जनजागृती मायकिंगद्वारे करण्यात येत आहे. आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कोरोना चाचणी अनिवार्य केली गेली आहे तसेच पॉझिटीव्ह आल्यास रुग्णालयात व निगेटिव्ह आल्यास ७ दिवस गृहविलगीकरण अनिवार्य करण्यात येत आहे.